![]()
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरने खळबळ उडवली असून शिवसेना ठाकरे गटात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाले असून काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे पुरावे समोर आणले नाहीत. मात्र ठाकरेंचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढची पावले टाकली जातील, असे शिंदे गटातून सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणले जाणार नाही, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाने हा दावा फेटाळून लावला असून, शिंदे गटाकडे सहा खासदार गेलेच नसून त्यातील दोन खासदारांनी अशा कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या राजकीय बंडखोरीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्र अद्याप गुलदस्त्यात का ठेवण्यात आले आहे? या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. जर खरोखरच हे ऑपरेशन यशस्वी झाले असेल, तर त्याचे भक्कम पुरावे समोर का आणले जात नाहीत? असा सवाल विचारला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांप्रमाणे ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांचे फोटो माध्यमांमध्ये का झळकले नाहीत आणि लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र अद्याप गुलदस्त्यात का ठेवण्यात आले आहे? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती राजकीय वर्तुळातून केली जात आहे. ऑपरेशन टायगर फुलप्रूफ या प्रश्नांबाबत आता शिंदे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, हे ऑपरेशन पूर्णपणे ‘फुलप्रूफ’ असून त्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे तूर्तास याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न करण्याची किंवा पुरावे लगेच समोर न आणण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. ठाकरे गट यावर काय कायदेशीर पावले उचलतो, याचा अंदाज घेऊनच पुढची चाल ठरवली जाणार आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस तरी या घडामोडींबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता नाही. शिवसेना ठाकरे गटाची उद्या बैठक शिवसेना ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता खासदारांच्या एकनिष्ठतेची खरी ‘लिटमस टेस्ट’ होणार आहे. या संभ्रमावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे गटाने गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावण्यात आला आहे. गुरुवारी होणाऱ्या या बैठकीला किती आणि नेमके कोणते खासदार हजेरी लावतात, यावरच ठाकरे गटाची पुढील राजकीय दिशा आणि रणनीती निश्चित होणार आहे. 6 खासदार आमच्यासोबतच दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आपले सहा खासदार गेले नसल्याचा ठाम विश्वास ठाकरे गटाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे, बंडाच्या चर्चेत असलेल्या सहापैकी दोन खासदारांनी पाठिंब्याच्या पत्रावर अद्याप स्वाक्षरीच केलेली नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडवून देणारे ‘ऑपरेशन टायगर’ खरोखरच यशस्वी झाले आहे की नाही, याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम असून, दोन्हीपैकी कोणत्याही गटाकडून अधिकृतपणे चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
Source link
'ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत!':ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिवसेना शिंदे गटाची सावध भूमिका