![]()
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेदरम्यान पुणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत, तर सुमारे दोन लाख मृत मतदारांची नोंद आढळून आली आहे. यामुळे आगामी प्रारूप मतदार यादीत या मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येत १२ ते १३ लाखांची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेची अंतिम मुदत ८ ऑगस्ट होती. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद आणि पडताळणीच्या गरजेमुळे ही मुदत १७ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे, १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदारांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी मिळेल. आवश्यक छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या एकूण १० लाख ८० हजार २७३ मतदार आहेत. यापैकी ५७ लाख ५८ हजार ६६२ मतदारांनी गणना अर्ज सादर केले आहेत. यातील ५२ लाख ३६ हजार ६७१ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, ते आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात आले आहेत. दरम्यान, सुमारे १५ लाख अर्ज अद्याप बीएलओ स्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये मृत, दुबार नोंदणी झालेले तसेच अनुपस्थित मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषतः, ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीची तीन वेळा नोंद घेऊन ती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप गणना अर्ज भरलेला नाही किंवा पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची माहिती घेऊन तातडीने पडताळणी पूर्ण करावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रांसह नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
पुण्यातील 11 लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत:अंतिम यादीतून नावे वगळली जाण्याची शक्यता