.


पर्यावरण संरक्षणासह जैव विविधतेच्या रक्षणासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत गुरूकुल बहुउद्देशीय संस्थेंतर्गत कार्यरत क्रीडा अकादमीद्वारे बुधवारी ५ ऑगस्टला वृक्षारोपण केले. याप्रसंगी १५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच वृक्षारोपण मोहिमेत सहर्ष सहभाग नोंदवला. या वेळी उपस्थित प्रत्येकाने स्वत:च्या घरी रोप नेत त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. गुरूकुल संस्थेत सकाळी ९.३० वाजतापासून ५० वर वृक्षांच्या रोपांची लागवड केली. नागरिकांनी गटागटाने वृक्षारोपण केले.
दैनिक दिव्य मराठीच्या या समाजसेवी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आवळा, वड, चिंच अशी विविध प्रकारच्या झाडांचे रोपेही १०० वर नागरिकांना घरातील अंगणात लागवडीसाठी देण्यात आली. नागरिकांनीच घरी वृक्षारोपण करायचे आहे, त्यामुळे आम्हाला रोपटे द्यावे, अशी मागणी केली.
वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा, आवळा, चिंचेच्या रोपट्यांना मागणी असल्याचे दिसले. अनेकांनी जैव विविधता टिकवण्यासाठी आम्ही अंगणात ही झाडे लावणार कारण, पक्षी, प्राण्यांना यापासून अन्न, रहिवास, सावली, संरक्षण मिळते. त्यामुळे अंगणातील वातावरण प्रसन्न राहते. शुद्ध व ताजी हवा मिळते. नैसर्गिकरित्या मिळणारा प्राणवायू हा अनमोल आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून आम्ही त्याचे संवर्धनही करणार आहोत. त्यामुळे पुढील पिढीसाठी ठेवा म्हणून वृक्षाची भेट देता येणार असल्याची भावना, या वेळी उपस्थित युवक, पुरुष, महिला नागरिकांनी व्यक्त केली.
या उपक्रमात भाजप नेते,सामाजिक कार्यकर्ते तुषार भारतीय, माजी महापौर, मनपा सभागृह नेते चेतन गावंडे, साहेबराव तिडके, हरगोविंद राठी, चंद्रशेखर चौधरी, गजानन मारूळकर, व्ही. डी. जोशी, अनिलसिंह गौतम, धनराज जुनघरे, जितेंद्र आनंदपारा, नरेंद्र मानेकर, अॅड. नंदकिशोर कलंत्री, किरण हातगांवकर, डॉ. कपिल वानखडे, मनोज भट्टड, प्रफुल गोसालिया, बाळू विलेवार, श्रीकांत तऱ्हाळकर, गणेश गुप्ता, संजय श्रॉफ, पवन तांबट, सूरज ठाकूर, राजेश मालठाणे, प्रफुल गांधी, एस.व्ही.खानापूरकर, प्रकाश देशपांडे, राजेश जगताप तसेच मोठया संख्येत महिला, पुरुष नागरिक व खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
झाडे टिकावित म्हणून मुळाजवळ जंतू नाशकाची फवारणी ः झाडांचे लावलेले रोपटे टिकावे त्यांना किड लागू नये म्हणून मुळाजवळ जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे लावलेले रोपटे हमखास जगेल, याची खात्री देता येणार आहे.
तसेच गुरूकुल बहुउद्देशीय संस्थेंतर्गत कार्यरत क्रीडा अकादमीतील धनुर्धर, भारोत्तोलक, व्यायामपटू, खेळाडू हे या वृक्षांची दररोज देखभाल करणार आहेत. काही झाडांचे रोपटे खाली लोंबकळू नये म्हणून त्यांना मजबूत काठ्यांचा आधार देण्यात आला.
गुरूकुल परिवार सामाजिक उपक्रमात सहभागी : भारतीय दैनिक दिव्य मराठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत असते. दिव्य मराठी व गुरूकुल संस्थेचे नाते परिवाराप्रमाणे आहे. त्यामुळे आम्हीही त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सहर्ष सहभागी होतो. पर्यावरण रक्षणासाठी आम्ही आज संस्थेत जी झाडे लावली, त्यांचे संरक्षण करणार आहेत. यात फळझाडांचाच विशेषत्वाने समावेश केल्याचे मनपाचे माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांनी नमूद केले.