Headlines

मुद्रांक शुल्कातून चार महिन्यांत 22 हजार कोटींचा महसूल:गेल्या वर्षीपेक्षा 17 टक्के अधिक, मालमत्ता व्यवहारांना गती




राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) 22 हजार 128 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत महसुलात 3 हजार 250 कोटी रुपयांची, म्हणजेच 17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. रेडी-रेकनर दरांमध्ये कोणताही बदल न करता ही वाढ साध्य झाली आहे. राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी 68 हजार 500 कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट दिले आहे. पहिल्या चार महिन्यांतील ही कामगिरी पाहता, विभागाने उद्दिष्टपूर्तीकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत 15 लाख 63 हजार दस्तनोंदणी झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन 17 लाख 21 हजार दस्तनोंदणी झाली आहे. भाडेकरार, निवासी घरे आणि नवीन मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये झालेल्या वाढीमुळे महसूल वाढीस मोठा हातभार लागला आहे. केवळ जुलै महिन्यात विभागाने 5 हजार 871 कोटी 16 लाख रुपयांचा महसूल जमा केला. यामुळे चालू आर्थिक वर्षातील एकूण महसूल 22 हजार 128 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दस्तनोंदणीतील वाढ आणि स्थावर मालमत्ता व्यवहारांमध्ये आलेली गती ही या महसूलवाढीमागील प्रमुख कारणे आहेत. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या निर्देशानुसार, दस्तनोंदणीची काटेकोर तपासणी आणि मुद्रांक शुल्कातील संभाव्य तफावत शोधून त्यावर केलेल्या कारवाईचाही महसूलवाढीत सकारात्मक परिणाम झाला आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या चार महिन्यांतील ही कामगिरी पाहता, विभागाला यंदाचे वार्षिक महसूल उद्दिष्ट गाठण्याबाबत आत्मविश्वास आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *