Headlines

रक्तरंजित थरारामुळे विक्रोळी हादरली!:गाण्याच्या मोठ्या आवाजामुळे 2 भावांनी काढला तिसऱ्याचा काटा,14 वर्षांच्या पुतण्यालाही सोडले नाही




मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरातून एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेची माहिती समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन सख्ख्या भावांनी आपल्याच एका भावाच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्रांनी निर्घृण हल्ला केला. या भयानक हल्ल्यात एका भावाचा आणि त्याच्या १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची पत्नी आणि लहान मुलगा मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण विक्रोळी पार्कसाईट परिसर हादरून गेला आहे. भयानक घटना नेमकी कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळी पार्कसाईट येथील राहुल नगरमध्ये विश्वकर्मा कुटुंबाचे वास्तव्य आहे. या घरात विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकत्र राहत होते, ज्यापैकी दोघे जण घराच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. पहाटेच्या वेळी सुनील विश्वकर्मा (वय ४०) यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरून त्यांचे दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांना राग आला. त्यांनी सुनील यांना गाण्यांचा आवाज कमी करण्यावरून जाब विचारला. सुरुवातीला या तिन्ही भावांमध्ये केवळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात या वादाचे रूपांतर एका भयानक हाणामारीत झाले. अख्ख्या कुटुंबावर धारदार शस्त्रांनी वार हाणामारी इतक्या टोकाला गेली की, सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी घरात उपलब्ध असलेल्या धारदार शस्त्रांनी थेट सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या भीषण हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा १४ वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचे प्राणज्योत मालवली. या जीवघेण्या हल्ल्यात सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि त्यांचा लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांचा तपास आणि संशय घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र आणि सूरज या दोन्ही आरोपी भावांना बेड्या ठोकल्या आहेत. केवळ मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून सख्खे भाऊ इतके क्रूर पाऊल उचलून अख्ख्या कुटुंबाला संपवू शकत नाहीत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्येमागे मालमत्तेचा किंवा इतर कोणता जुना वाद होता का? याचा सखोल तपास आता पार्कसाईट पोलीस करत आहेत. आरोपींच्या कसून चौकशीतून हत्याकांडाचे खरे कारण लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर अमरावती जिल्ह्यातील सावर्डीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव ट्रकने कामावरील मजुरांना चिरडले. या भीषण धडकेत ट्रकचालकासह दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *