![]()
पुणे शहरात फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या तीन दिवसांत 274 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, 84 मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. शहरात विशेषतः रात्री-अपरात्री बुलेट आणि इतर दुचाकींना बेकायदा फेरफार केलेले सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत केवळ बेकायदा सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवरच नव्हे, तर अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सर वाहनांमधून काढून जप्त करण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अनधिकृत सायलेन्सर किंवा कर्णकर्कश हॉर्नचा वापर टाळावा आणि इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना केले आहे. शहरात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Source link
पुणे पोलिसांकडून 84 सायलेन्सर जप्त:सायलेन्सरमध्ये फेरफार करणाऱ्या 274 दुचाकीस्वारांवर पोलिसांचा दणका