Headlines

पुण्यात पिस्तूल बाळगणारे 3 फरार आरोपी जाळ्यात:शिवण्यातून 1.69 लाखांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई




पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाने गंभीर गुन्ह्यातील तीन फरार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल, रोकड आणि चारचाकी वाहन असा सुमारे 7.91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्वामी नारायण मंदिराजवळील परिसरात सापळा रचून करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शुभम सतीश डोके (वय 20), शुभम साधू चव्हाण (वय 20) आणि त्यांचा आणखी एक साथीदार यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध नन्हे पुणे पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून ते फरार होते. गुन्हे शाखेच्या युनिट-3 ला आरोपी स्वामी नारायण मंदिर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, रोकड आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 7 लाख 91 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पुढील तपासासाठी नन्हे पुणे पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने आणखी एका कारवाईत शिवणे परिसरातील अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमालाही अटक केली. देशमुखवाडी परिसरात छापा टाकून सोमनाथ शामराव गरुड (वय 44) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख 69 हजार 458 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट-3, पोलिस निरीक्षक प्रशांत अजबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *