Headlines

मतांच्या जुळवाजुळवीसाठी प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचलाय!:अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या बैठकीत बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ




विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण शिगेला पोहोचले असतानाच, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांच्या एका वादग्रस्त विधानाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करणे आणि तालुकानिहाय ‘प्रसाद’ पोहोचवण्याबाबत बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा एक अंतर्गत बैठकीतील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सत्ताधारी शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कथित विधानामुळे सुशिक्षित आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही मतांसाठी ‘लक्ष्मीदर्शना’सारख्या मार्गांचा अवलंब केला जात आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. गुप्त बैठकीत नेमके काय घडले? अमरावती येथील एका नामांकित हॉटेलमध्ये महायुती आणि शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बच्चू कडू आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रमुख नेते मार्गदर्शन करत होते. या बैठकीत कार्यकर्त्यांना जिंकण्याची समीकरणे समजावून सांगताना बच्चू कडू यांनी निवडणुकीतील रणनीतीवर रोखठोक भाष्य केले. “आपली फळी कोणासोबत आहे हे आधी निश्चित करा. त्यानंतर मुस्लिम गटांमधील मते आपल्या बाजूने कशी वळवता येतील, यावर सूक्ष्म नियोजन करा. विरोधकांची मते आपल्याकडे वळवण्यात यश आले तर विजयाचा मार्ग कसा सुकर होतो,” यावर कडू यांनी भर दिला. ‘प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचलाय’ तालुकानिहाय यंत्रणेचा आढावा घेताना कडू म्हणाले, “प्रत्येक तालुक्यात आपली विश्वासू माणसे कामाला लागली असून, सर्वांपर्यंत ‘प्रसाद’ व्यवस्थित पोहोचला आहे.” निवडणुकीच्या तोंडावर ‘प्रसाद’ या शब्दाचा नेमका अर्थ काय, यावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. तो व्हिडिओ काढतोय, त्याला बाहेर काढा! बच्चू कडू हे अत्यंत उत्साहात कार्यकर्त्यांना ‘प्रसाद’ आणि रणनीतीचे कानमंत्र देत असतानाच, सभागृहातील एक व्यक्ती मोबाईलद्वारे हे संपूर्ण भाषण गुप्तपणे रेकॉर्ड करत असल्याचे कडू यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. भाषण सुरू असतानाच बच्चू कडू यांनी अचानक थांबून संबंधित व्यक्तीकडे बोट दाखवले आणि, “तो रेकॉर्डिंग करतोय, मोबाईल बंद करायला सांगा आणि त्याला बाहेर काढा,” असे स्पष्ट निर्देश उपस्थितांना दिले. मात्र, कडू यांनी रोखण्यापूर्वीच या भाषणातील काही सेकंदांचे संवेदनशील चित्रीकरण मोबाईलमध्ये कैद झाले होते. ही क्लिप बाहेर पडताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. चौरंगी लढतीमुळे चुरस वाढली यंदाच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची झाली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांना अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. भाजपने ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सोडली असून, विद्यमान आमदार किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी थेट बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यासोबतच संगीता शिंदे, शेखर भोयर आणि डॉ. सुमित पवार यांसारख्या तगड्या अपक्षांनी रिंगणात उडी घेतल्याने मतांचे मोठे विभाजन होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतही बिघाडी दुसरीकडे महाविकास आघाडीतही एकमत झाले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे यांना मैदानात उतरवले. विदर्भ जुनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे (विज्युक्टा) डॉ. अविनाश बोर्डे हेही ताकदीने लढत आहेत. ————————————————– हेही वाचा… विरोधकांचे आंदोलन पेड आणि विदेशी रिमोट कंट्रोलवर:विद्यार्थ्यांना रोज 3 हजार देऊन गर्दी जमवली जातेय; भाजपचे कुंवर बासित अली यांचा आरोप “देशाचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या प्रगतीचा आणि ‘विकसित भारत 2047’ चा ध्यास घेतला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश त्याच मार्गावर वेगाने पुढे जात असताना, काही देशविरोधी शक्ती विदेशी ताकदींच्या इशाऱ्यावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने ही नैसर्गिक नसून पूर्णपणे पेड आहेत. विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना संविधानाच्या नावाखाली भडकवून रोज तीन हजार रुपये वाटून रस्त्यावर आणले जात आहे. मात्र, देश अशा कारस्थानांना भीक घालणार नाही,” असा खळबळजनक आणि घणाघाती आरोप भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा मुंबईचे अध्यक्ष वसीम खान आणि पक्षाचे सह-माध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *