![]()
ठाणे शहरात 93 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करून फरार झालेल्या दोन आरोपींना पुणे वाहतूक पोलिसांनी आप्पा बळवंत चौक परिसरातून ताब्यात घेतले. वाहतूक शाखेच्या विश्रामबाग विभागाने केलेल्या या तत्पर कारवाईमुळे ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले असून, दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय संजय तांबे (वय 22) आणि ओंकार विष्णू शिरसाठ (वय 24, दोघे रा. ठाणे) अशी आहेत. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी एका व्यक्तीची तब्बल 93 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी पुण्यातील आप्पा बळवंत चौक परिसरात असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली. ही माहिती तत्काळ पुणे वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग विभागाला देण्यात आली. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक म्हात्रे, पोलिस हवालदार खरात, तसेच पोलिस शिपाई गौड, शेख, कानवडे आणि प्रधान यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते ठाण्यातील 93 लाखांच्या फसवणूक प्रकरणात फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांना पुढील तपासासाठी कोपरी पोलिस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे पुणे आणि ठाणे पोलिसांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण समोर आले असून, तांत्रिक माहितीच्या आधारे फरार आरोपींना जेरबंद करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरी पोलिस करत आहेत.
Source link
93 लाखांच्या फसवणुकीतील फरार आरोपी पुण्यात जेरबंद:विश्रामबाग वाहतूक पोलिसांची आप्पा बळवंत चौकात धडाकेबाज कारवाई