Headlines

राष्ट्रीय महामार्गाची 'एनओसी' न घेताच वाईनशॉप सुरू:उपविभागीय अधिकाऱ्यांचे उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे पत्र




राष्ट्रीय महामार्गाचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र न घेताच बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या माळेगाव शिवारातील वाईनशॉपवर तातडीने कारवाई करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. या पत्रानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण कळमनुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारातील जमीन आणि जागा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामध्ये बाळकृष्णा पब्बावार यांची जागा संपादित करून त्यांना नियमानुसार सुमारे 46 लाख रुपयांचा भरघोस मोबदलाही देण्यात आला होता. या मोबदल्यात दोन मजली इमारत, दोन बदामाची झाडे आणि तीन नारळाच्या झाडांचा समावेश होता. मात्र, मोबदला उचलल्यानंतरही काही जागा राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आलीच नसल्याचा प्रकार राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे. ‘एनओसी’शिवाय चालणारे वाईनशॉप बंद करण्याचे निर्देश या शिवारात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कसलीही ना हरकत न घेता वाईनशॉप सुरू करण्यात आल्याची बाब प्रकल्प संचालकांच्या पत्रातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे हे वाईनशॉप त्वरित बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती. याच पत्राची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला तातडीने पत्र पाठवले आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अहवालानुसार सदर वाईनशॉपसाठी ‘एनओसी’ घेतलेली नसल्याने नियमानुसार आवश्यक ती योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश या पत्रात दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वाईनशॉप किंवा दारू विक्रीच्या परवानग्या देताना प्रत्येक कागदपत्राची अत्यंत काटेकोर आणि बारीक तपासणी केली जाते. असे असताना माळेगाव शिवारातील वाईनशॉपला परवानगी देताना राष्ट्रीय महामार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ का तपासले गेले नाही? असा थेट सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात असून उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर शंका व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *