Headlines

औट्रम घाटाचे काम तातडीने पूर्ण करण्याची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी:खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची दिल्लीत गडकरींशी भेट‎




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गांच्या निकृष्ट कामांचा प्रश्न आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारात पोहोचला आहे. जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती मिळण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या बैठकीत खासदार संदिपान भुमरे यांनी कन्नड तालुक्यातील रखडलेल्या औट्रम घाटाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. हे काम तातडीने पूर्ण झाल्यास वाहनचालकांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले या भेटीदरम्यान सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील करोडी ते तेलवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या अतिशय निकृष्ट कामाचा मुद्दाही मांडण्यात आला. महामार्गाचे काम पूर्ण होऊन अल्पावधीतच रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठ्या शारीरिक व आर्थिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी करून कसून चौकशी करण्यात यावी, या कामात कसूर करणाऱ्या व नियमांना फाट्यावर मारणाऱ्या दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि तातडीने या खराब रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गांच्या कामात गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेला आणि अधिकाऱ्यांना कडक निर्देश द्यावेत, अशी विनंतीही आमदार विलास भुमरे यांनी यावेळी केली. या सर्व मागण्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीनसाठी स्वतंत्र बायपासची मागणी छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावर सातत्याने वाढणारा ताण लक्षात घेता, चित्तेगाव, बिडकीन आणि ढोरकीन या तिन्ही गावांसाठी स्वतंत्र बायपास रस्त्यांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी केली. हा मार्ग धार्मिक, व्यावसायिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः बिडकीन परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे या भागात अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *