Headlines

श्री संत सावता महाराजांनी पांडुरंगाला हृदयात स्थान दिले- सारंगधर महाराज:खंडाळा येथे संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहाची सांगता‎




संत सावता महाराजांनी जगाचे मालक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पांडुरंगाला आपल्या हृदयात स्थान दिले आहे, असे प्रतिपादन सारंगधर महाराज भोपळे यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे श्री संत सावता महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री शंकर स्वामी महाराज संस्थान शिऊरचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मानवजातीला अध्यात्माची जाणीव करून देण्यासाठी संतांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. देवाच्या प्रत्येक लीलेमध्ये अध्यात्म दडलेले असते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य संत करतात. ‘संत’ हीच ती चावी आहे, जिच्या माध्यमातून अध्यात्माचे दरवाजे उघडतात. संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत होते. व्यवसायाने माळी असूनही त्यांनी आपल्या भजन, कीर्तन आणि सेवेतून समाजात समता व भक्तीचा संदेश रुजवला. त्यांच्या शिकवणीतून आजही लाखो वारकरी प्रेरणा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार प्रा. रमेश बोरनारे आणि वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी विशेष उपस्थिती दर्शवत महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सप्ताहात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तो उत्साहात पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, ज्ञानेश्वर जगताप, माजी सरपंच उत्तम पवार, गोरखनाथ शिंदे, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, माजी उपसभापती प्रकाश शिंदे, संजय सूर्यवंशी, सूरज पवार, विलास पवार, जगन मगर, रमेश जेजूरकर, बाबासाहेब शिंदे, तुषार पवार, संदीप पवार, शिवराज पैठणकर, मुरली थोरात, सुभाष जेजूरकर, आदित्य पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाडीतून भव्य मिरवणूक व भाविकांना महाप्रसादाचे वाटप कीर्तनापूर्वी श्री संत सावता महाराज मंदिरापासून सावता महाराजांच्या प्रतिमेची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथक आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली ही मिरवणूक संपूर्ण गावातून मार्गस्थ झाली. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *