![]()
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मुंगसापूर (ता. कन्नड) गावात स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ८१ वर्षीय वृद्ध महिला गंगूबाई रामहरी गायकवाड यांच्या पार्थिवावर भरपावसात, चिखलाची वाट तुडवत एका खासगी शेतात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ स्मशानभुमीचा प्रश्न सोडवला नाही तर पुढील वेळी प्रशासकीय कार्यालयात अंत्यसंस्कार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गंगूबाई गायकवाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मात्र, सतत पडणारा पाऊस आणि गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अखेर दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुडघाभर चिखलातून अंत्ययात्रा काढून श्रीराम चव्हाण यांच्या खाजगी शेतात ओल्या लाकडांवरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात डिजिटल सुविधा व रस्ते झाले तरी स्मशानभूमी का नाही, असा सवाल मनसेचे सरचिटणीस गौतम शिरसाट यांनी उपस्थित केला. पुन्हा अशी वेळ आल्यास पंचायत समिती कार्यालयात अंत्यसंस्कार करू, असा इशाराही त्यांनी दिला. गावात स्मशानभूमीची नोंद नसून गायरान जमिनीवर अतिक्रमाणाचा प्रश्न आहे. याबाबत मोजणी, जागेचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असल्याचे मुंगसापुरचे ग्रामविकास अधिकारी विश्वास सोनवणे यांनी सांगितले. लवकरच स्मशानभूमी उपलब्ध करून देणार Ãमुंगसापूर येथील घटनेची दखल घेऊन विस्तार अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवले आहे. भूमि अभिलेख विभागामार्फत वन जमिनीची मोजणी करून गावाला लवकरच स्मशानभूमी उपलब्ध करून दिली जाईल. – ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी, कन्नड
Source link
कन्नडच्या मुंगसापूरची घटना:स्मशानभूमीअभावी पावसातच अंत्यसंस्कार, चिखल तुडवत शेतात 81 वर्षीय वृद्ध महिलेस शेवटचा निरोप