![]()
महापालिकेच्या मराठी शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. मनसेने १० एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मराठी शाळा बंद पडू नयेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्याचा आरोप करत मनसेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेत महापालिकेच्या सर्व मराठी शाळांमध्ये एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियानांतर्गत महापालिकेला २.५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली. तसेच १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मराठी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले. आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष राजेश काळे, शेखर पोटदुखे, ज्ञानेश्वर पाटील कराळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंभेरे, अविनाश मुऱ्हेकर, दादा खेते, कुशल देव, डॉ. प्रशांत लोथे, विलास घोंगडे, शाम किल्लेकर, गोस भाई, गब्बर भाई, विकास शेवलकर, गणेश खोडके, मेघराज वाघाडे आदी उपस्थित होते. गेटवर चढून मनसैनिकांचा संताप महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना सुरक्षारक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेट बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आंदोलकांनी तातडीने चर्चेसाठी यावे, अशी मागणी केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आयुक्तांनी शाळांमधील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एका महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Source link
मराठी शाळांतील पाण्याच्या प्रश्नावर मनसेचे आंदोलन:महापालिका आयुक्तांचे महिन्यात सुविधा देण्याचे आश्वासन