Headlines

कन्नड तालुक्याची एसआयआर अभियानात आघाडी:डिजिटायझेशनमध्ये जिल्ह्यात प्रथम, मतदारसंघात 96 टक्के फॉर्मचे वाटप




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात एसआयआर अभियान वेगाने सुरू आहे. या अभियानामध्ये कन्नड तालुक्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, कन्नड मतदारसंघात सर्वाधिक प्रगती नोंदवण्यात आल्याची माहिती तहसीलदार सारिका भगत यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कन्नड मतदारसंघात एकूण ३ लाख ३० हजार ७०७ मतदार असून ३६८ बीएलओ कार्यरत आहेत. यातील ३ लाख २० हजार ६५७ म्हणजेच तब्बल ९६.९६ टक्के मतदार पडताळणी फॉर्मचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, २ लाख ७४ हजार ३१० फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८२.९५ टक्के इतकी आहे. गेल्या एका दिवसातच १.७ टक्क्यांची विक्रमी प्रगती झाली असून जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत कन्नड तालुक्याने आघाडी कायम ठेवली. कन्नड तालुक्यातील बीएलओ आपली जबाबदारी चोख बजावत वेळेत काम पूर्ण करत आहेत. यापूर्वी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे आणि मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या निगराणीखाली हे काम सुरू आहे. कन्नड नगर परिषदेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागातील मतदारांची शहरात नोंदणी करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाला होता. आता एसआयआर अभियानादरम्यान या चर्चेची प्रत्यक्षात प्रचिती येऊ लागली आहे. शहरातील अनेक प्रभागांत बीएलओंना ३०० ते ४०० नागरिक शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित पत्त्यावर गेल्यानंतर नागरिक प्रत्यक्ष आढळत नसल्याची व शेजाऱ्यांकडे विचारणा केल्यावर कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार काही बीएलओंनी केली आहे. कन्नड शहराची लोकसंख्या सुमारे ५५ हजारांच्या आसपास आहे. यासंदर्भात बोलताना मुख्याधिकारी रवींद्र लांडे म्हणाले की, काही नागरिकांनी स्थलांतर केले आहे, काही मयत झाले आहेत तर अनेक जण प्रत्यक्ष पत्त्यावर सापडत नाहीत. नगर परिषदेच्या वतीने बीएलओंना मक्रणपूर, रेल, कनकावती आणि मोहर्डा या गावांच्या सर्वेक्षणाचे कामही देण्यात आले आहे. नव्या प्रणालीनुसार आता नागरिकांना केवळ एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असल्याने या सर्वेक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एसआयआर अभियानाची जिल्ह्यातील सद्य:स्थिती संपूर्ण जिल्ह्यात एकूण ३२ लाख १६ हजार १६७ मतदार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८५.२१ टक्के फॉर्मचे वाटप आणि ६२.५१ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. यात वैजापूर ८२.८४ टक्के आणि सिल्लोड ७५.४८ टक्के डिजिटायझेशनसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, शहरातील तिन्ही मतदारसंघांमधील डिजिटायझेशनचे प्रमाण अद्याप ५० टक्क्यांच्या खालीच असल्याचे दिसून आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *