![]()
पैठण राज्य सरकारने जाहीर केलेला नवीन कर्जमाफीचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी पैठण बसस्थानक चौकात जीआरची होळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच मर्यादा घालण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदविला. एकाच गावातील, समान परिस्थितीतील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आज शेतकरी लाखो रुपयांच्या कर्जाखाली दबलेला असताना सरकारने जाचक अटी लादून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात पवन शिसोदे, साईनाथ कर्डीले, शिवाजी साबळे, अनिल राऊत, किशोर सदावर्ते, प्रदीप ठोंबरे, जयदीप पवार, अंकुश काळे, जिजा प्रवाणे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते. कर्जमाफीच्या शासन निर्णयाची शेतकरी संघटनेकडून पैठण येथे होळी करण्यात आली. २ लाख रुपयांपर्यंत समान कर्जमाफी लागू करावी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची मर्यादा तत्काळ रद्द करावी, सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत समान कर्जमाफी लागू करावी, ओटीएस योजनेतील आधी रक्कम भरण्याची अट शिथिल करावी, कट-ऑफ तारखेचा पुनर्विचार करावा, ॲग्रीस्टॅक नोंदणीअभावी एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची हमी द्यावी आणि या प्रश्नांवर सरकारने सर्वपक्षीय व शेतकरी संघटनांची बैठक बोलवावी, अशा मागण्या केल्या.
Source link
कर्जमाफी जीआरची पैठणला होळी; शासनाने फसवणूक केल्याचा आरोप:संघटनेकडून 50 हजारांची मर्यादा रद्द करण्याची मागणी