Headlines

कळवण न्यायालय आवार जलमय; वकील, पक्षकारांची वाढली गैरसोय:सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वकिलांत नाराजी‎




येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे न्यायालयाच्या आवारात तसेच प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. कळवण-देवळा रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट न्यायालय परिसरात येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नागरिकांना चिखल व गुढगाभर पाण्यातून मार्ग काढत न्यायालयात प्रवेश करावा लागत असून घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरात भूमिगत वीज तारा असल्याने शॉर्टसर्किट होऊन पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह येणाऱ्या पक्षकारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाबाबत वकील संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तोंडी पाठपुरावा केला आहे. तसेच न्यायालय प्रशासनामार्फतही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे गंभीर बाब असल्याचे मत वकील बांधवांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जलनिस्सारण व्यवस्था उभारून समस्या सोडवावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *