![]()
विधान परिषद निवडणुकीत पक्षनेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे विदर्भातील दोन्ही जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कोणतीही माहिती न देता अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ कमी असल्याचे कारण कांबळे देत असले, तरी त्यांनी विरोधकांशी राजकीय तडजोड केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. याचप्रमाणे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनीही शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली होती. अग्रवाल यांच्या या कृतीमुळे भाजप महायुतीचे अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले. उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर माघार घेतल्याने काँग्रेसची राज्यभरात नाचक्की झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने दोन्ही नेत्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. पक्षाने विश्वास दाखवून उमेदवारी दिली असताना, नेतृत्वाला अंधारात ठेवून पक्षाला अडचणीत आणणारी ही कृती अक्षम्य असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे विदर्भातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि राजकीय तडजोडीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.
Source link
काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे निलंबन:पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने कारवाई