![]()
सेनगाव तालुक्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या गुरुवारी ता. 16 दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांना गोरेगाव पोलिसांच्या पथकाने सकाळी आठ वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात स्थानबध्द करण्यात आले आहे. मात्र या घटनेचा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने तिव्र निषेध व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहिर करा यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर क्रांतीकारी शेतकरी संघनटेने सातत्याने आंदोलन केले आहे. रास्तारोको, कृषी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला. या प्रकरणात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिसांनी त्यांना बुधवारी ता. 15 ताब्यात घेऊन वाशीम येथे सोडले आहे. या प्रकारामुळे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप कावरखे यांनी केला असून त्या ठिकाणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान, कावरखे यांची हद्दपारी रद्द करावी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार संघटनेकडून आंदोलनाचे नियोजन देखील गोपनियरित्या केले जात असून कुठल्याही क्षणी आंदोलनाला सुरवात केली जाईल असे पतंगे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गुरुवारी ता. 16 सकाळी सेनगाव तालुक्यातील ताकतोडे येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी करणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र त्यांच्या दैाऱ्यात कुठेही आंदोलन होऊ नये याची पुरेपुर दक्षता प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आज सकाळी आठ वाजता त्यांच्या ताकतोडा येथे गावात जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. जोपर्यंत दौरापूर्ण होत नाही तो पर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातच स्थानबध्द केले जाईल असे सांगण्यात आले. या कारावामुळे मुळे पतंगे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. या कारवाईमुळे आमचे आंदोलन थांबणार नाही या उलट आंदोलन आणखी तिव्र केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
कारवाई:पालकमंत्र्यांच्या ताकतोडा दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात; गोरेगाव पोलिस ठाण्यात स्थानबध्द