![]()
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात 67 टक्के वाढ केली आहे. आता प्रति दागिना 45 रुपयांऐवजी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. 14 सप्टेंबर 2026 च्या अधिसूचनेनुसार हे सुधारित दर लागू झाले आहेत. या वाढीमुळे दागिन्यांच्या निर्मितीचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (CJC) या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. हॉलमार्किंग शुल्क दागिन्याच्या वजनानुसार नाही, तर ‘प्रति दागिना’ आकारले जाते. त्यामुळे एक ग्रॅमचा लहान दागिना असो किंवा मोठ्या वजनाचा, प्रत्येक दागिन्यावर 75 रुपये शुल्क लागेल. यामुळे हलक्या वजनाचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त खर्च येईल, असे सराफ क्षेत्रातील प्रतिनिधींचे म्हणणे आहे. देशात हॉलमार्किंगची व्याप्ती खूप वाढली आहे. जुलै 2021 ते मार्च 2026 या काळात 60 कोटींपेक्षा जास्त दागिन्यांचे एचयुआयडीसह हॉलमार्किंग झाले आहे, असे CJC ने सांगितले आहे. कामाचे प्रमाण इतके वाढले असताना शुल्क कमी होण्याऐवजी त्यात 67 टक्के वाढ झाल्याने सराफ क्षेत्रातून प्रश्न विचारले जात आहेत. CJC चे अध्यक्ष राजेश रोकडे आणि उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली. देशभरात बनावट आणि बेकायदेशीर हॉलमार्किंग केंद्रांवर कारवाई सुरू असताना, अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या सराफांवरच अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोन्याचे दर आधीच जास्त असताना, हॉलमार्किंग शुल्कवाढीमुळे व्यापाऱ्यांचा खर्च आणखी वाढेल. हा खर्च दागिन्यांच्या किमतीत समाविष्ट होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. त्यामुळे CJC ने केंद्र सरकार आणि बीआयएसकडे 75 रुपयांची शुल्कवाढ तात्काळ थांबवून पूर्वीचे 45 रुपयांचे शुल्क कायम ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच, हॉलमार्किंगच्या संपूर्ण खर्चाची पारदर्शक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Source link
हॉलमार्किंग शुल्कात थेट 67 टक्के वाढ:केंद्र सरकारच्या निर्णयावर सराफांचा तीव्र आक्षेप