मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून आणि सातत्याने नेत्यांवर वापरल्या जाणाऱ्या भाषेवरून राज्य मंत्रिमंडळात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा ज्येष्ठ नेते आणि म
.
मंत्रिमंडळ बैठकीतील ‘इनसाईड स्टोरी’: नेमकं काय घडलं?
कॅबिनेट बैठकीतील बंद दाराआडच्या चर्चेचा पाढा वाचताना भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळाची अधिकृत बैठक आटोपल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. मी कोणाची नावे घेत नाही, पण उपस्थित प्रत्येक मंत्र्याने संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांबद्दल बोलले जाते, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आईचा उल्लेख करून अपशब्द वापरले जातात, इतर नेत्यांविषयी घाणेरडी भाषा वापरली जाते. इतकेच काय, आंदोलनावेळी तिथे गेलेल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांशीही अत्यंत अपमानास्पद पद्धतीने संवाद साधला गेला. हे चाललेय तरी काय?” असा प्रश्न सर्वांनी विचारला.
देर आये दुरुस्त आये
“सरकारने त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या, तरीही त्यांची गाडी थांबायला तयार नाही. कॅबिनेटमध्ये जेव्हा सगळे मंत्री यावर बोलू लागले, तेव्हा मी शांत राहून मनात म्हटले— ‘देर आये, दुरुस्त आये’. आम्ही सुरुवातीला बोलत होतो तेव्हा कोणी गांभीर्याने घेत नव्हते, आता सर्वांना त्याची झळ बसत आहे.”
बीड जळत असताना पोलीस हतबल होते, म्हणून मी मैदानात उतरलो
आपण जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका का घेतली, याचा घटनाक्रम सांगताना भुजबळ म्हणाले, “सुरुवातीला तो माझ्यावर सतत बोलत होता, पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा आंदोलनाच्या नावाखाली आमदारांची घरे जाळली गेली, कार्यकर्त्यांचे हॉटेल्स पेटवून राख केली गेली आणि संपूर्ण बीड शहर पेटवले गेले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती.”
“पोलीस हतबल झाले होते, कोणी काही बोलायला तयार नव्हते. तिथे परिस्थितीची पाहणी करायला जाणारा मी पहिला नेता होतो. शांततेत चालणाऱ्या आंदोलनाला विरोध नव्हता; पण घरं जाळली जात असताना मी शांत बसू शकत नव्हतो. त्यामुळेच मी राजीनामा खिशात घालून अंबडला ओबीसींची महाएल्गार सभा घेतली आणि त्यातून ओबीसींची खरी ताकद समोर आली.”
जरांगेंचा काहीच अभ्यास नाही; कायद्याबाहेर जाऊन मदत कशी करणार?
मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवत त्यांनी स्पष्ट केले. “मनोज जरांगे यांचा कायद्याचा किंवा आरक्षणाचा कोणताही अभ्यास नाही. सरकारने मराठा समाजाला भरभरून निधी दिला आहे, शैक्षणिक आणि सामाजिक सवलती दिल्या आहेत. जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने पूर्ण केल्या; मात्र जी एक मागणी कायद्याच्या चौकटीत बसतच नाही, ती सरकार कशी पूर्ण करणार? कायद्याचे उल्लंघन करून सरकारने निर्णय घ्यावा का?”
महायुती सरकारला सावध करताना ते म्हणाले, “या सरकारला ६० ते ७० टक्के ओबीसी समाजाने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला जे देता येईल ते कायद्याने द्या; पण त्याचवेळी ओबीसी समाज नाराज होणार नाही याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे.”
शिंदेंना जरांगेंची मदत झाली नाही
निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला का, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, “मला तसे मुळीच वाटत नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काम यामुळे महायुतीला विजय मिळाला. जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत आधी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आणि ऐनवेळी माघार घेतली. ते येवल्यात माझ्या विरोधात प्रचार करायला येऊन बसले होते, तरीही जनतेने मला निवडून दिले.”
“सध्याच्या गणेशोत्सवावर कोणाचा प्रभाव आहे, असे विचारले तर नकारात्मक दृष्टीने जरांगे आणि सकारात्मक दृष्टीने पुण्याचे बापट यांचा प्रभाव दिसतो.”
अर्थखाते आणि धनंजय मुंडे
महायुतीत अर्थखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होते आणि ते पुन्हा पक्षालाच मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच आमदार धनंजय मुंडे हे एका मोठ्या समाजाचे नेतृत्व करत असल्याने त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान जरूर मिळाले पाहिजे; मात्र जागा किती उपलब्ध आहेत त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
————
हेही वाचा…
जरांगेंच्या उपोषणाचा 19 वा दिवस: महंत शिवाजी महाराजांच्या विनंतीनंतर जरांगेंनी लावून घेतले सलाईन; डॉक्टरांकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहता अखेर महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रही विनंतीनंतर त्यांनी वैद्यकीय उपचारांना सहमती दर्शवली असून सलाईन लावून घेतले आहे. उपोषण आणि सलाईन नाकारल्यामुळे जरांगे यांच्या शरीरातील बीपी आणि शुगरची पातळी प्रचंड घटली होती. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय पथकाने जरांगे पाटील यांची तपासणी करून तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले असले, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपोषण मागे घेऊन रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी