मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. “मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!” या मोहिमेअंतर्गत गेल्या 17 दिवसांप
.
10 वर्षांत 780 निर्णय, पण प्रगती दीड टक्काही नाही- अंबादास दानवे
पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी राज्य शासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली.1 सप्टेंबरपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सलग नऊ दिवस दौरा करून 24 अपूर्ण प्रकल्पांची आणि दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. सर्व ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून अपूर्ण कामांचा जाब विचारण्यात आला आहे.
2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणि सप्टेंबर 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये 780 निर्णय जाहीर करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात मराठवाड्याच्या विकासाची प्रगती दीड टक्क्याच्या वर गेलेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्रकल्पांची दुरवस्था
- उजनी-सीना कोळेगाव: ३३.६६ टीएमसी पाणी येण्यास अजून २ ते ३ वर्षे लागणार असताना सत्ताधाऱ्यांनी पाणी आल्याचा खोटा उत्सव साजरा केला.
- लेंडी प्रकल्प: १९८६ चा हा प्रकल्प २०२६ उजाडले तरी पूर्ण झालेला नाही; १४ पैकी ४ गावांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे.
- ईसापूर धरण: यावरील पाणीपुरवठा योजना केवळ थकीत वीज बिलांअभावी बंद पडल्या आहेत.
याशिवाय धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात साधे एमआरआय (MRI) मशीन नाही, जालन्याचा ड्रायपोर्ट निव्वळ एका एजन्सीच्या घशात घातला गेला असून तिथे पायाभूत सुविधांचा पत्ता नाही, तर बीडमधील कस्तुरबा गांधी वसतिगृहात केवळ दौऱ्याच्या आदल्या दिवशी व्यवस्था उभारण्याचे ढोंग करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
मराठवाड्यात गंभीर दुष्काळ, तरीही सरकारचे दुर्लक्ष
मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हालअपेष्टा मांडताना दानवे म्हणाले, मराठवाड्यात सरासरी ३० टक्क्यांहून अधिक पाण्याची तूट असून १७१ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. बागायती पिकांना इमर्जन्सी लोडशेडिंगचा फटका बसत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करणे गरजेचे असताना, सत्ताधारी मात्र केवळ कोरडी आश्वासने देत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
मराठवाड्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढाईचा इशारा देताना ते म्हणाले, संविधानातील कलम 371(2) नुसार मराठवाड्याला समन्यायी विकास आणि समतोल निधी वाटपाचा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. सरकारने मराठवाड्याच्या तोंडाला अशीच पाने पुसणे सुरू ठेवल्यास, या कलमाच्या आधारे उच्च न्यायालयातच नव्हे तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.
उद्धव ठाकरेंचा दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रात्री रस्त्याने छत्रपती संभाजीनगर येथे दाखल होणार असून, ते मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील. या स्मारकाजवळ उभारण्यात आलेले मुक्ती संग्राम संग्रहालय हे उद्धव ठाकरेंच्याच संकल्पनेतून साकारले गेले असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ध्वजारोहणाशी याचा कोणताही संबंध नसून यात कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्या, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होईल. ही कोणतीही जाहीर सभा नसून हक्कासाठी पुकारलेले धरणे आंदोलन असल्याने नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी शांततेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सरकारवर टीका
पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता दानवे यांनी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. सरकारकडून 15 पैकी 13 मागण्या मान्य केल्याचे सांगितले जाते, मग नेमक्या कोणत्या 13 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने आंदोलकांशी संवाद ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले. आंदोलनातील भाषेवर होणाऱ्या टीकेबाबतही त्यांनी भाषेच्या मुद्द्यामुळे मूळ मागण्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी भूमिका मांडली.
——————-
हेही वाचा…
13 पैकी 12 मागण्या मान्य, सणाच्या काळात आंदोलन नको: बाळासाहेबांचे आयुष्य हिंदुत्वासाठी, तर उद्धव ठाकरे हिंदू विरोधकांसोबत- राम कदम

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि शिवसेना कुणाची यावर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर भाजप आमदार राम कदम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. रस्त्यावर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सध्या मुंबईत गणेशोत्सवानिमित्त मोठी गर्दी असते. अशा सणाच्या काळात आंदोलन करणे योग्य नाही, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी