Headlines

कार्य निर्विघ्न होण्यासाठी मंगलाचरण आवश्यक- गणेशानंद शास्त्री महाराज:गणेशोत्सवानिमित्त ‘देवपुळचा राजा’ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ‎




कार्यारंभी इष्टदेवतेची स्तुती करणे म्हणजेच मंगल. वेदांना प्रमाण मानणाऱ्या शिष्टांची परंपरा जपण्यासाठी आणि कोणत्याही कार्याची निर्विघ्न परिसमाप्ती व्हावी यासाठी मंगलाचरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन गणेशानंद शास्त्री महाराज (भगवानगड, मेहगाव) यांनी केले. कन्नड तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या ‘देवपुळचा राजा’ (नवसाचा गणपती) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञ सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्या कीर्तन सेवेत भगवानगड, मेहगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार महंत गणेशानंद शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘चिंतामणी देवा गणपतीसी आणा’ या प्रासंगिक अभंगावर अत्यंत भावपूर्ण निरूपण केले. तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ देत महाराजांनी चिंचवड येथील प्रसंग सांगितला. तुकोबारायांनी चिंतामणी देवाला ब्राह्मणांसोबत भोजनासाठी बसवले आणि उपास्य दैवत गणपतीला भोजनास बोलावण्यास सांगितले. त्यावर चिंतामणी देवांनी ‘अभिमानामुळे आमचे अस्तित्व नागवले’ अशी कबुली दिली. वेळ निघून अन्न थंड झाल्यावर तुकोबारायांनी प्रार्थना केली आणि प्रत्यक्ष गणपती भोजनास उपस्थित झाले. यातून भक्तीचा अभिमान बाळगल्यास विनाश होतो आणि खरी भक्ती नेहमी नम्र असावी, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. कीर्तनादरम्यान महाराजांनी मंगल संकल्पनेचे दोन मुख्य पैलू मांडले. अभिष्ठार्थसिद्धि: ज्या वर्णनाने किंवा क्रियेने इष्ट फळाची प्राप्ती होते, ते मंगल. विघ्नविनाशानुकूल व्यापार: कार्यारंभी विघ्न येऊ नये म्हणून केलेली अनुकूल क्रिया म्हणजे मंगल. याशिवाय, महाराजांनी ‘आशीर्वाद रूप मंगला’चे महत्त्व सांगताना संत ज्ञानेश्वरांच्या ‘चांगदेव पासष्टी’तील प्रथम ओवी आणि ज्ञानेश्वरीतील ‘पसायदान’ या श्रेष्ठ रचनांचे दाखले दिले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी या मंगलमय निरूपणाने उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्याला देवपुळ, खातखेडा, वासडी, हस्ता, मेहगाव, तपोवन, साखरवेल, पळशी खुर्द आणि रामनगर परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *