Headlines

कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी 34 कोटींचा निधी देणार:मालवणी भाषेच्या संशोधनासाठी सिंधुदुर्गात स्वतंत्र केंद्र उभारणार – उदय सामंत




कोकणातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कुडाळ एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासह विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कुडाळ एमआयडीसीसाठी सुमारे 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अंतर्गत वीज जोडणी आणि केबलिंगच्या कामांसाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच उद्योगांसाठी आकारण्यात येणारा कर 7 रुपयांवरून 4 रुपये करण्यात आला आहे. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सिंधुदुर्गात दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात ही माहिती दिली. कुडाळ ही कोकणातील महत्त्वाची औद्योगिक वसाहत असून, या एमआयडीसीच्या विकासासाठी निलेश राणे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच ओसरी येथील एमआयडीसीच्या प्रश्नांवरही लक्ष देण्यात आले आहे. या भागातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि उद्योजकांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये कराचा दर 7 रुपयांवरून 4 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी स्किल सेंटर उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जात आहे. कुडाळ एमआयडीसीमधील अंतर्गत वीज व्यवस्था आणि केबलिंगचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या कामांसाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. निलेश राणे यांच्या मागणीनुसार सुमारे 34 कोटी रुपयांचा निधी कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी देण्यात आला आहे. या निधीतून होणाऱ्या कामांचा सामंत यांनी आढावाही घेतला. एमआयडीसीमध्ये 43 भूखंडधारकांनी भूखंड घेतले आहेत. या उद्योजकांना पुढील नियोजन कसे करावे, उद्योग सुरू करण्यासाठी कोणते सहकार्य आवश्यक आहे आणि त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योजकांच्या अडचणींसाठी दर गुरुवारी अधिकारी उपस्थित राहणार सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रत्येक कामासाठी रत्नागिरीतील एमआयडीसी कार्यालयात जावे लागू नये, यासाठी प्रशासनाच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर गुरुवारी सिंधुदुर्गात एमआयडीसीचे आरओ, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. एमआयडीसीशी संबंधित कागदपत्रे आणि प्रक्रियांमध्ये साक्षीदार म्हणून अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. त्यासाठी रत्नागिरीहून अधिकारी बोलवावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन नायब तहसीलदार उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांची साक्षीदार म्हणून नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. याशिवाय एमआयडीसीचे डेप्युटी सीईओ दर 15 दिवसांनी, तर जॉइंट सीईओ दर तीन महिन्यांनी सिंधुदुर्गात उपस्थित राहणार आहेत. या सर्व निर्णयांमुळे उद्योजकांच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंगुळीतील रेखांकनाच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांचा गैरसमज झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात पिंगुळी येथील रेखांकनाचा मुद्दा उपस्थित केला होता. संबंधित रेखांकन रद्द करण्याची मागणी करत हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या विषयाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले. या प्रकरणात पूर्वी काय घडले आणि सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली असती तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता. काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांचे मत तयार झाले असण्याची शक्यता आहे, असे सामंत म्हणाले. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्यास संबंधित मंत्री त्यावर उत्तर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पिंगुळीतील रेखांकनाच्या विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पाचवा दिवस होता. यावर तोडगा काढण्याबाबत विचारले असता, स्थानिक आमदार निलेश राणे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणातून निश्चितपणे मार्ग निघेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. गोकुळमधील नियुक्त्यांवर अभ्यास करूनच भूमिका मांडणार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये सरकारने चार सदस्यांची नियुक्ती केल्याच्या निर्णयावरही सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. गोकुळमध्ये एका गटाची सत्ता असताना सरकारने अशा प्रकारे सदस्य नियुक्त करणे योग्य आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. मात्र, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल, असे सांगत सामंत यांनी थेट भूमिका मांडणे टाळले. जयंत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या बाबतीत अशाच प्रकारच्या नियुक्त्या झाल्यास त्या योग्य वाटायला हव्यात, अशी टिप्पणी केल्याबाबतही त्यांना विचारण्यात आले. तसेच राहुल गांधी यांनी सरकारवर मतांवर डल्ला मारल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना सामंत यांनी गोकुळच्या नियुक्त्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याऐवजी या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे पुन्हा सांगितले. मात्र, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी टीका केली. मागील 90 निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या पक्षांनी आपल्या मतांची परिस्थितीही लक्षात घ्यावी, असे ते म्हणाले. विधान परिषदेच्या 28 निवडणुकांमध्ये बॅलेटवर काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी झाल्याचा दावाही त्यांनी केला. गोकुळच्या प्रकरणावर संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबर 2027 पर्यंत मराठी भाषा भवनाचा पहिला टप्पा पूर्ण होणार मुंबईतील मराठी भाषा भवनाचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नसल्याचा मुद्दाही पत्रकारांनी उपस्थित केला. यावर सामंत यांनी मराठी भाषा भवनाचे काम रखडले असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, यापूर्वीच्या सरकारच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कामाला गती देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषा भवनाच्या बांधकामाचा एक टप्पा पूर्ण झाला असून, डिसेंबर 2027 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मालवणी भाषेच्या संशोधनासाठी सिंधुदुर्गात केंद्र; स्वतंत्र शब्दकोश तयार करणार सिंधुदुर्गातील मालवणी भाषेचे जतन, संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र मराठी विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उदय सामंत यांनी केली. मालवणचे आमदार यांनी मराठी भाषा मंत्री म्हणून सामंत यांच्याकडे मालवणी भाषेसाठी संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी अशा केंद्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी मांडले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात जिल्हा मराठी विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातील एक केंद्र सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. या केंद्रात मराठी भाषेबरोबरच मालवणी भाषेवरही संशोधन केले जाईल. मालवणी भाषेतील शब्द, साहित्य आणि स्थानिक बोलींचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. मालवणी भाषेशी संबंधित लोककला आणि परंपरांनाही या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेषतः दशावतारासारख्या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामुळे स्थानिक कलाकारांना संशोधन, प्रसिद्धी आणि व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे सामंत यांनी सांगितले. याशिवाय मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये मालवणी भाषेचाही समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्या पोस्टचा सामंत यांच्याकडून निषेध सोशल मीडियावर औरंगजेबाचे कौतुक करणारी पोस्ट काही शेतकऱ्यांनी केल्याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू होता. त्यामुळे तो महाराष्ट्राचा आणि देशाचाही शत्रू होता, अशी भूमिका त्यांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करणे योग्य नाही. संबंधित पोस्टचे कोणीही समर्थन करू नये, असे सांगत त्यांनी या प्रकाराचा जाहीर निषेध केला. राजू शेट्टी यांच्या मागण्यांवर शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करणार कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मागण्या मान्य न झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हे बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सामंत यांनी स्वतः राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. आंदोलनामागील नेमक्या मागण्या काय आहेत, हे समजून घेण्यासाठी राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनयना वहिनी यांच्याशी चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे सामंत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडेच अर्थमंत्रिपद राहावे, सुनेत्रा पवार यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची मागणी होत असल्याच्या प्रश्नावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यामुळे अर्थमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहावे, अशी त्या पक्षातील नेत्यांची, विशेषतः सुनेत्रा पवार यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक विचार करतील, अशी खात्री असल्याचेही सामंत म्हणाले. वाळू माफियांकडून महसूल अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; कठोर कारवाईची मागणी भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकारी थोडक्यात बचावल्याची माहिती पत्रकारांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी वाळू माफियांनी अशा प्रकारचे कृत्य केले असेल, तर पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईदरम्यान हल्ले होणे गंभीर बाब आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे सामंत यांनी सांगितले. हेही वाचा…. गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री:गोकुळ ताब्यात घेण्याचा सरकारचा ‘रडीचा डाव’ उधळण्यासाठी कोल्हापुरात येणार गोकुळ दूध संघातील शासननियुक्त 5 स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापूरच्या राजकारणात संघर्ष तीव्र झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून, 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारचा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत आपण स्वतः या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता राजकीय रंग चढला आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *