![]()
रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठात ‘दीक्षारंभ’ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर होते, तर अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कुलगुरू डॉ. आवलगावकर यांनी साहित्य ही सर्व विचारांना कवेत घेऊन चालणारी एक मोठी संस्था असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. आवलगावकर म्हणाले की, साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित जीवनविषयक दृष्टिकोन विचारात घेता, साहित्य हे सर्व विचारांना सामावून घेणारे एक मोठे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांचा विचार प्रगल्भ व्हावा आणि ज्ञानार्जन हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असावे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात बीए आणि एमए अभ्यासक्रमांसाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना माहिती पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. नव्या आध्यात्मिक व वैचारिक जीवनाची सुरुवात, सामाजिक आणि उच्च विचारधारेचा स्वीकार यांसारख्या संस्कारांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. कुलगुरू डॉ. आवलगावकर यांनी पुढे सांगितले की, जीवनाचा प्रवास खडतर असून अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यापीठ एका कुटुंबाप्रमाणे कार्य करत असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही बाबतीत कमी पडू देणार नाही. ज्ञानार्जन ही एक पूजा असून, ध्येयवेडे होऊन जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे, असेही ते म्हणाले. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे यांनी मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमातून मानवी जीवनदृष्टी प्राप्त होऊन व्यक्तिमत्त्व प्रगत होते, असे सांगितले. विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. यामध्ये डॉ. मनोज उज्जैनकर (नाट्यशास्त्र), प्रा. डॉ. मनोज मुनेश्वर (मराठी), प्रा. अजय पटिले (पत्रकारिता आणि जनसंवाद) आणि प्रा. राहुल राठोड (इंग्रजी) यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रेयस कोल्हेकर यांनी केले, तर प्रा. प्रियंका तायडे यांनी आभार मानले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. प्रा. आशालाता गुट्टे, डॉ. प्रा. पल्लवी मावंदे, डॉ. प्रा अर्चना आखरे, डॉ. प्रा नितीन रामटेके, डॉ प्रा स्वप्निल मून यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
कुलगुरू डॉ. आवलगावकर: साहित्य सर्व विचारांना कवेत घेणारी संस्था:मराठी भाषा विद्यापीठात 'दीक्षारंभ' संवाद कार्यक्रमात प्रतिपादन