Headlines

केंद्राने महागाईच्या भडक्यात 'घासलेट' टाकले:जनतेच्या खिशावर 10 लाख कोटींचा डल्ला, विरोधकांचा इंधन दरवाढीवर घणाघात




आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी महाग झाले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर आज 15 मे पासून लागू झाले आहेत. सुमारे 2 वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर महागाईच्या भडक्यात घासलेट अर्थात रॉकेल ओतल्याची टीका केली आहे. रोहित पवारांनी काढली मनमोहन सिंगांची आठवण रोहित पवार म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग साहेबांच्या UPA सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रती बॅरल असतानाही तत्कालीन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझलचे दर 60 रुपयांच्या आसपास स्थिर ठेवून जनतेला महागाईची झळ लागू दिली नाही. पण 2014 नंतर भाजप सरकार आल्यापासून कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रती बॅरलवरुन सरासरी 60 डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर 60 रुपयांवरुन निम्म्याने कमी करण्याऐवजी उलट करांमध्ये 9 रुपयांवरुन 32 रुपये वाढ करुन केंद्र सरकारने ते 90 रुपये प्रती लिटरच्या आसपास नेऊन ठेवले आणि सामान्य जनतेच्या खिशावर अक्षरशः 10 लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. आज युद्धजन्य परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर वाढताच 5 राज्यातील निवडणूक होईपर्यंत जीव मुठीत धरून ठेवलेल्या केंद्र सरकारने निवडणुकीचा स्वार्थ साधताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन नफेखोरी हाच आमचा धंदा असून जनतेशी काहीही देणंघेणं नाही, हेच दाखवून दिलं. ही दरवाढ भाजपच्या अंध भक्तांसाठी देशभक्ती असली तरी सामान्य माणसासाठी महागाईच्या भडक्यात टाकलेलं घासलेट आहे. देशवासीयांनो आता आवाज उठवायचा नसेल तर आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक आहे. निमूटपणे सहन करणं. पण मला अजूनही आशा आहे की, सरकारकडूनच जनतेची अशी लूट होत असताना सर्वजण व्यक्त होतील आणि आपला रोष दाखवून देतील, असे ते म्हणाले. निवडणुका संपल्या, आता वसुली सुरू शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. निवडणुका संपल्या… त्यामुळे आता मोदी सरकारची वसुली सुरू पेट्रोल आणि डिझेलचे दर 3-3 रुपयांनी वाढवले तर CNG च्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली. हा प्रश्न फक्त पेट्रोल-डिझेलच्या 3 रुपयांच्या दरवाढीचा नाही, तर सतत वाढणाऱ्या महागाईच्या वाढत्या ओझ्याचा आहे. सद्या परिस्थिती अशी आहे की, एकीकडे जनतेचे खिसे रिकामे होत आहेत, तर दुसरीकडे भाषणांमधील ‘अच्छे दिन’ मात्र अजूनही सुरूच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *