.

मानूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या के. बी. एच. आश्रमशाळेच्या प्रांगणात ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेच्या परिसरातील पूर्वनियोजित खड्ड्यांमध्ये नीम, वड, पिंपळ, करंज आणि आंबा आदी सुगंधी, छायादार व औषधी वृक्षांची लागवड केली .
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ उपक्रमांतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आले. बदलते हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक डी. व्ही. अहिरे यांनी सांगितले. पृथ्वीचे आणि पर्यायाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी, के. बी. एच. आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक के. एम. गातवे, एन. आर. गायकवाड, एम. के. निकम, ही. एन. आहेर, सी. जी. जाधव, बी. के. आहेर, जे. जे. दळवी, ए. जी. चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून परिसरातील नागरिक व पालकांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्येक रोपाला नियमित पाणी देणे, त्याचे जतन करणे आणि ते मोठे होईपर्यंत जबाबदारीने संगोपन करण्याची शपथ घेतली.