![]()
‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथे बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आमदार गायकवाड यांच्या वर्तणुकीचा समाचार घेतला आहे. मेघा पानसरे म्हणाल्या, आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? मी याचा निषेध करते. संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचावे पुढे बोलताना मेघा पानसरे म्हणाल्या, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आहेत, वाटल्या गेल्या आहेत. हे पुस्तक आजही वाचले जाते. कॉम्रेड पानसरे यांनी जो विचार सांगितला आहे तो मारता येत नाही, त्यावर दूसरा तुल्यबळ विचार त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा विचार केला जात आहे. संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचलेय, असे मला वाटत नाही. त्यांनी केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे. त्यांनी हे पुस्तक वाचावे, हे आवाहन आहे. पुस्तकात कोणत्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले आहेत, हे त्यांनी बघावे, तपासून घ्यावे, मग स्वतःचे वक्तव्य करावे, असे आवाहन मेघा पानसरे यांनी केले आहे. धमक्या आल्या तरी कॉम्रेड पानसरे यांनी नाव नाही बदलले मेघा पानसरे यांनी सांगितले की, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक 80 च्या दशकात प्रकाशीहत झाले. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दलचा वाद नवीन नाही. कॉम्रेड पानसरे यांनी त्याला समर्पक उत्तर दिले आहे. त्यावेळी त्यांना अनेक धमक्या आल्या, पण त्यांनी पुस्तकाचे नाव मागे घेतले नाही. मात्र, शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांकडून अशी भाषा केली जाते. आम्ही कॉम्रेड पानसरे यांचे विचार इतरांना समजून घेता यावेत, यासाठी पुस्तकाच्या आणखी प्रती छापू. संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही वकिलांचा सल्ला घेत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.
Source link
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनेने संजय गायकवाडांना सुनावले:म्हणाल्या- शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेताय?; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद