.

गणेशोत्सव म्हटले की विविध आकर्षक सजावट, देखावे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करण्याची परंपरा पाहायला मिळते. याच परंपरेला सर्जनशीलतेची जोड देत अकोट शहरातील लांडगे वेटाळ परिसरातील युवा प्रतिष्ठानद्वारे स्थापित वीर बजरंग गणेशोत्सव मंडळाने यंदा अनोखी संकल्पना साकारली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खंडोबा अर्थात मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडाची भव्य प्रतिकृती उभारून, त्यात खंडोबाच्या रुपातील गणरायाची स्थापना केली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम व कल्पकतेने जेजुरी गडाची प्रतिकृती तयार केली आहे. गडाच्या प्रवेशापासून पायऱ्या, मंदिर परिसर, मंदिरासमोरील विविध भागांची रचना बारकाईने करण्यात आली आहे. जेजुरी गडावर भाविकांना अनुभवायला मिळणाऱ्या वातावरणाची अनुभूती या प्रतिकृतीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गडाच्या पायऱ्यांपासून थेट मल्हारी मार्तंडाच्या मंदिरापर्यंतचा परिसर आकर्षक पद्धतीने साकारण्यात आला आहे. मंदिरासमोर दोन भव्य दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. त्यासोबत नंदीची आकर्षक प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देखाव्याला धार्मिक आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
भव्य देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाच्या रूपातील गणरायाची स्थापना. गणरायाला खंडोबाच्या रूपात साकारल्याने भक्तांना गणेश, खंडोबा या दोन्ही आराध्य दैवतांच्या भक्तीचा अनोखा अनुभव मिळत आहे. गणरायाची मूर्ती, मंदिराची रचना आणि सभोवतालच्या देखाव्याचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ही संकल्पना ठरत आहे.
आकर्षक रंगसंगती अन् नेत्रदीपक रोषणाई : जेजुरी गडाची प्रतिकृतीला अधिक उठावदार करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक रंगसंगतीचा वापर केला आहे. मंदिर परिसरात विविध प्रकारच्या दीपमाळा आणि स्पॉटलाइटची रोषणाई करण्यात आली आहे. दिवसा गडाची रचना, मंदिराची बारकाईने केलेली सजावट लक्ष वेधून घेते, तर रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी रोषणाईमुळे संपूर्ण देखावा मनमोहक दिसतो. प्रकाशझोतात न्हाऊन निघालेला जेजुरी गडाचा हा देखावा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.
कार्यकर्त्यांची मेहनत, कल्पकतेतून आकार ^ ही भव्य प्रतिकृती साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. संकल्पनेपासून प्रत्यक्ष उभारणीपर्यंत विविध बाबींचे नियोजन करून गडाची प्रतिकृती आकाराला आली. मर्यादित साधनसामग्रीचा कल्पक वापर करत गडाची रचना अधिक वास्तवदर्शी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण निर्माण न करता, महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न आहे. – प्रसाद गान, अध्यक्ष, वीर बजरंग गणेशोत्सव मंडळ.
युवा प्रतिष्ठानचे वीर बजरंग गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात नावीन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी ओळखले जाते. गणेशमूर्तीची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी असो, आकर्षक देखावे असोत किंवा महिलांचे ढोल पथक असो, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून दरवर्षी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही या परंपरेला कायम ठेवत जेजुरी गडाची प्रतिकृती, खंडोबाच्या रुपातील गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे परिसरातील गणेशभक्त व नागरिकांमध्ये या देखाव्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.