Headlines

खरीप पिके वाचवण्यासाठी पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांचे रात्रभर जागरण:शेतकऱ्यांसमोर संकट, वन विभागाने लक्ष देण्याची मागणी‎




पिंपळदरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी आणि लगतच्या संपूर्ण परिसरात सध्या खरीप हंगामातील पिके अतिशय जोमात आली असून शेते हिरवीगार दिसू लागली आहेत. मात्र, पिके ऐन बहरात असतानाच वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. रानडुक्कर, नीलगाय, हरिण व इतर रानटी प्राण्यांचे टोळच्या टोळ रात्रीच्या वेळी शेतात घुसून कपाशी, सोयाबीन, मका, तूर, उडीद आणि मुगाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास वन्यप्राण्यांच्या तोंडी जात असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना थेट शेतात उंच मचाण उभारून दिवस-रात्र पहारा द्यावा लागत आहे. पिकांची राखण करण्यासाठी परिसरातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने शेताच्या मध्यभागी बांबू, लाकूड आणि लोखंडी अँगलच्या मदतीने तात्पुरती मचाणे तयार केली आहेत. कडाक्याची थंडी, वारा आणि डासांचा उपद्रव सहन करत शेतकरी रात्ररात्र या मचाणावर बसून राहतात. रात्रीच्या अंधारात वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी टॉर्च, बॅटरी, फटाके फोडणे, ढोल-थाळ्या वाजवणे तसेच शिट्ट्यांचा वापर केला जात आहे. मात्र, वन्यप्राण्यांची संख्या प्रचंड वाढल्याने व ते माणसांच्या आवाजाला सरावल्याने हे सर्व पारंपारिक उपाय आता तोकडे पडू लागलेआहेत. रात्रभर जागून पिकांची राखण करणे आणि दिवसभर पुन्हा शेतात राबणे, यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण येत आहे. सध्या सर्वच खरीप पिके वाढीच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहेत. याच काळात पिकांचे नुकसान झाल्यास उत्पादनात घट होऊन मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बँक व सावकारांचे कर्ज काढून, बियाणे व खते खरेदी करून पेरणी केली होती. त्यामुळे पिके नष्ट झाल्यास संपूर्ण वर्षभराचे गणित विस्कळीत होऊन शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. याकडे वन विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रानडुकरांचे टोळ काही वेळात शेत उद्ध्वस्त करतात रात्रभर उघड्यावर जागून पिकांचे रक्षण करावे लागते. एखाद दुसरा तास जरी डोळा लागला, तरी रानडुकरांचे टोळ काही मिनिटांत संपूर्ण शेत उद्ध्वस्त करून टाकतात. दरवर्षी खरीप हंगामात हीच बिकट परिस्थिती निर्माण होते. वन विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई खात्यावर जमा करावी, अन्यथा आमच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण होईल, असी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त या समस्येबाबत वन विभागाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा तीव्र आरोप पिंपळदरीतील शेतकऱ्यांनी केला आहे. वन विभागाने केवळ आश्वासन न देता संवेदनशील भागात तातडीने ‘सोलर फेन्सिंग’ (सौर कुंपण) उभारावे, वन्यप्राणी प्रतिबंधक यंत्रणा सक्रिय करावी आणि नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथके नेमावीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *