![]()
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेल्याने दुष्काळाचे संकट गहिरे झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी आणि डोमेगाव परिसरात खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पिकांनी पाहणी करुन तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले. तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांच्या पुढाकाराने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी व डोमेगाव येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. पावसाअभावी उभी पिके वाळली असून खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. जमिनीतील ओलावा संपल्यामुळे आगामी रब्बी हंगामाचीही शक्यता उरलेली नाही. शेतातील भयाण वास्तव पाहून लोकप्रतिनिधींनी खचलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. “शासनाकडून पंचनाम्याचा फार्स न करता थेट भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर तीव्र पाठपुरावा करू,” असे आश्वासन खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी बळीराजाला दिले. पीक पाहणी नंतर शिष्टमंडळाने गंगापूर तहसील कार्यालयावर धडक देत नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांना १० प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाने तातडीने अंमलबजावणी न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी लोकप्रतिनिधींनी दिला. यावेळी काँग्रेस प्रभारी संदीप बोरसे, मजहर पटेल, विजय मनाळ, पुंडलिक जंगले, नईम मन्सुरी, विलास आबा पवार, बद्रीनाथ बारहाते, खालेद पठाण, सुभाष बनकर, नंदकिशोर बागल, अब्दुल्ला चाऊस, रफिकखा पठाण, अनिल खवले यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
गंगापूर तालुक्यात दुष्काळामुळे बांधावर काँग्रेसकडून पीक पाहणी:खासदार कल्याण काळे यांनी तहसीलदारांना दिले 10 मागण्यांचे निवेदन