![]()
उझबेकिस्तान मधील समरकंद येथे नुकत्याच पार पडलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या गटात रौप्य पदक, महिला गटात कांस्य पदक पटकावताना भारतीय बुद्धिबळपटूंनी सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडकावर मोहर उमटविली आणि जागतिक बुद्धिबळावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. चेन्नई येथे 2022मध्ये आणि बुधापेस्ट 2024 मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड नंतर भारतीयांची सर्वसाधारण विजेतेपदाची ही हॅटट्रिक ठरली. खुल्या गटातील भारतीय संघात प्रशिक्षक ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणन याच्या नेतृत्वाखाली अर्जुन इरिगेसी, आर प्रज्ञानंद, निहाल सरीन, जगज्जेता डी गुकेश आणि विदित गुजराथी या ग्रँडमास्टरचा समावेश होता. तर, महिला संघात प्रशिक्षक ग्रँडमास्टर स्वयंम्स् मिश्रा याच्या नेतृत्वाखाली कोनेरू हंपी, दिव्या देशमुख,आर वैशाली या ग्रँडमास्टर सह वंतिका अग्रवाल,सविता श्री बी या आंतरराष्ट्रीय मास्टरचा समावेश होता. वैयक्तिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. सविता श्री हिने पदार्पणातच पाचव्या पटावर अपराजित राहताना 10 पैकी 9 गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. जॉर्जिया विरुद्धच्या अंतिम फेरीत बरोबरी साधल्यामुळे भारतीय संघाला कांस्य पदक मिळवता आले. दिव्या देशमुख हिने दुसऱ्या पटावर रौप्य पदक, डी गुकेशने रौप्य पदक, तर कोनेरू हंपी व वंतिका अग्रवाल यांनी कांस्य पदके पटकावली. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे या सर्व संघांचे पथक प्रमुख होते. भारतात परतल्यानंतर पुणेकर बुद्धिबळ प्रेमींतर्फे नगरसेवक सुनील पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. समरकंद ऑलिम्पियाड वर आशियाई संघांनी वर्चस्व गाजवताना 6 पैकी 5 सांघिक पदके पटकावली. त्यामध्ये खुल्या गटात उझबेकिस्तान भारत व जर्मनी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर राहिले. तर महिला गटात चीन, कझाकस्तान आणि भारत यांनी पहिली तीन स्थाने पटकावली. भारत सरकारचा सर्वांगीण पाठिंबा आणि राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणारे क्रीडा क्षेत्राला पोषक असे धोरण यामुळे भारताला हे यश मिळाले, असा विशेष उल्लेख अभिजीत कुंटे यांनी केला. भारतीय बुद्धिबळ पटुंच्या कामगिरीबद्दल बोलताना कुंटे म्हणाले की, हा प्रदीर्घ प्रवास अखेर यशदायी ठरला आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन सुधारणा, नियोजनबद्ध पूर्वतयारी आणि सर्वोतोपरी पाठिंबा देणाऱ्या यंत्रणा यावर आधारित असणाऱ्या परिश्रमांना यश मिळणारे हे फळ आहे. भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सात्तत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच सलग तिसऱ्या ऑलिम्पियाड मध्ये आम्ही गॅपरिंदाश्विली करंडक पटकावू शकलो आहे. श्रीनाथ नारायणन आणि स्वयंम्स् मिश्रा या आमच्या प्रशिक्षकांनी गेली सहा वर्षे अथक परिश्रम केले असून ते या संघाचे कणाच ठरले आहेत. तसेच प्रत्येक खेळाडूंनी १०० टक्के योगदान दिल्यामुळे हि कामगिरी आम्हाला करता आली आहे.
Source link
भारतीय बुद्धिबळपटूंनी सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक जिंकला:उझबेकिस्तानमधील ऑलिम्पियाडमध्ये रौप्य, कांस्य पदके मिळवत वर्चस्व सिद्ध केले