![]()
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझर यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर बंदी घालण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणे यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, खजिनदार मेहबूब खान आणि कार्याध्यक्ष राजू कांबळे यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे खूप जास्त ध्वनिप्रदूषण होते. प्लाझ्मा, प्रेशर, मिडच्या प्रचंड आवाजामुळे अनेक वृद्ध आणि लहान मुलांना बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो. हा त्रास थांबवण्यासाठी आणि आपला धार्मिक-सांस्कृतिक उत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी या सिस्टिम्सवर बंदी घातल्यास असोसिएशनचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. यावेळी शिरीष पाठक, सुनील ओव्हाळ, रमेश धोत्रे, उदय इनामके, राजरत्न पवार, संतोष गायकवाड आणि ज्येष्ठ कमिटी सदस्य बंडूशेठ वाळवेकर हे देखील उपस्थित होते. असोसिएशनचे पुण्यात सुमारे ५५० सदस्य आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून पुण्याबाहेरील काही व्यावसायिक गणेशोत्सवादरम्यान प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझर या तंत्रज्ञानाचा वापर करून परिस्थिती खराब करत आहेत. असोसिएशनच्या सदस्यांकडून वापरल्या जाणाऱ्या सिस्टिम्स चांगल्या कंपन्यांच्या असतात. त्यातून ऐकणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. आम्ही सिस्टिम, स्पीकर, अॅम्प्लीफायर, मिक्सर यांसारखी उपकरणे पुरवतो, पण प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझर पुरवत नाही, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवात या उपकरणांना मोठी मागणी असल्याने देशातील अनेक व्यावसायिक पुण्यात येऊन त्या भाड्याने देतात. साउंड, लाईट आणि जनरेटरचा व्यवसाय सुरू राहावा, पण प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझरचा वापर न करता गणेशोत्सव व इतर सण आनंदाने साजरे व्हावेत, अशी असोसिएशनची भूमिका आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याबाहेरील व्यावसायिक प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत, ज्यामुळे आवाजाचा खूप अतिरेक होतो. कोणतीही साधी साउंड सिस्टिम साधारणपणे ७०-८० डेसिबल आवाजात असते. पण प्लाझ्मा, प्रेशर, मिड वापरल्यास आवाजाची पातळी ११० डेसिबलच्याही पुढे जाते. यालाच ‘डीजेचा त्रास’ असे म्हटले जाते. याबाबत असोसिएशन जनजागृती करत आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांसमोर या संदर्भात प्रात्यक्षिकही दिले आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्याच वेळी स्थानिक गणेश मंडळांशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या 4 ते 5 तरुणांचा गट तिथे आला. त्यांनी बापट यांना अडवून त्यांच्याशी वाद घातला आणि काही क्षणांतच त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी काही काळ अवाक झाले होते. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, तो एका स्थानिक गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून, शहरात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Source link
गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर, मिड, लेझर बंदीला असोसिएशनचा पाठिंबा:पुणे साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका