![]()
मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणमासातील पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे श्रावणमासातील पहिल्या शनिवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरात तिरंगी रंगाचे फुग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून निघाले होते. दरम्यान, श्रावण महिन्यात लहान मुले, महिला भाविक दूरवरून पायी चालत गवळीशिवरा नगरीत दाखल होऊन मोठ्या मनोभावे दर्शन घेतले. श्रावणात दर शनिवारी पंचक्रोशीतील भाविकांच्या अनेक पायी दिंड्या महारुद्र चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात. श्रावणमासातील पहिल्या शनिवारी सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत सुमारे एक लाखापर्यंत भाविकांनी महारुद्र हनुमानाच्या दर्शनासाठी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांनी महारुद्र मंदिरात मनोभावे पूजा अर्चा करून दर्शन घेतले. श्रावणात भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसरात तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी मंदिर प्रशासनाकडून स्वयंसेवकांची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहण्याची सोय इत्यादी बाबींकडे मंदिर ट्रस्टीचे प्रामुख्याने लक्ष राहते. यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पुरुषांसह १५ पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला तसेच वसू सायगाव येथील बीएमजी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका घेत देखरेख केली. दरम्यान, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या महिला व भाविकांच्या गर्दीवर सीसीटीव्हीची निगराणी आहे. श्रावण मासातील पहिला शनिवार असल्याने ट्रस्टी अध्यक्ष संताराम केरे, उपाध्यक्ष पाडुरंग केरे, सचिव सुखदेव गवळी, कोषाध्यक्ष पांडुरंग गवळी, सहसचिव अंबादास केरे, सदस्य मारुती गवळी, विलास पांडे, सुभाष केरे, लिपिक गणेश गवळी, पुजारी नागेश पोळ आदींसह मंदिर प्रशासन तसेच ग्रामस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी पुढाकार घेतला होता.
Source link
गवळीशिवरा:महारुद्र मारुतीच्या चरणी 1 लाख भाविक नतमस्तक