![]()
रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाईल. प्रवाशांना त्रास होणार नाही, तसेच रेल्वे अंडरपासमधील खड्ड्यांवरही काम केले जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना व अधिकाऱ्यांनी स्थानक पाहणीदरम्यान दिले. लासलगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी उपप्रबंधक मुकेश कुमार मीना व अधिकारी गुरुवारी दुपारी आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे, बाळासाहेब शिरसाठ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या अडचणी व स्थानकाच्या विकासाबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी स्थानकाच्या नुकत्याच झालेल्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. याची योग्य ती दखल घेऊन प्रवाशांना त्रास होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होत असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेचा उड्डाणपूल तयार असतानाही वाहतूक का सुरू करण्यात आलेली नाही, याबाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के जगताप यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली. बाह्य वळण रस्ता लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच बाजार समितीचे सभापती डी.के जगताप यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.
Source link
लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना होणारा त्रास थांबणार:मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना यांचे आश्वासन