![]()
पहाटेच्या अंधारात अचानक धुराचे लोट उठले अन् काही वेळात ज्वाळांनी बारदानाचे गोदाम कवेत घेतले.शहरातील भाग्योदय अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये रविवारी (दि. १६) पहाटे घडलेल्या या अग्नितांडवाने मोठी खळबळ उडाली. सर्वप्रथम वॉचमनच्या नजरेस आग पडल्यानंतर धावाधाव सुरू झाली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या दुर्घटनेत सुमारे एक लाख बारदान जळून ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पोलिस पंचनाम्यात नोंद आहे. गठ्ठ्यांच्या आतपर्यंत पोहोचलेली धग विझत नसल्याने अखेर जेसीबीने गोदामाची भिंत फोडून जळता माल बाहेर काढण्याची वेळ आली. या आगीने आणखी काही अंतर कापले असते तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असती. कारण गोदामाला लागूनच शांतीलाल पहाडे यांचा जिनिंग उद्योग, तेल रिफायनरी कारखाना आणि सरकी ढेप निर्मितीचा मोठा उद्योग आहे. ज्वाळा या भागापर्यंत पोहोचल्या असत्या तर नुकसान कित्येक पटींनी वाढून मोठी औद्योगिक दुर्घटना घडण्याचा धोका होता. ^आगीत मोठ्या प्रमाणावर बारदान जळाले असून ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आग लगतच्या इतर उद्योगांपर्यंत पोहोचली नाही. सुदैवाने आगीचा फैलाव रोखण्यात आल्याने ५० लाखांचे बारदान भस्मसात झाले; पण त्यापुढील मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण आता तपासातून स्पष्ट होणार आहे. शांतीलाल पहाडे, अध्यक्ष, भाग्योदय जिनिंग उद्योग बंदिस्त गोदामात बारदानाचे गठ्ठे एकावर एक असल्याने आग आतपर्यंत पोहोचली होती. बाहेरून पाणी मारूनही आतील धग कमी होत नव्हती. अखेर जेसीबीच्या साहाय्याने भिंतीचा काही भाग फोडून मार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर जळालेले आणि अर्धवट पेटलेले गठ्ठे बाहेर काढून त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वीजपुरवठ्याचा वारंवार लपंडाव सुरू असून कधी उच्च दाबाने वीज येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन ठिणगी पडली आणि त्यातूनच आग भडकली का, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक तपासणीनंतरच खरे कारण समोर येणार आहे.
Source link
वैजापुरात अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गोदामाला आग:सुमारे 1 लाख बारदाना भस्मसाथ