![]()
भाजपा नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात केलेले बेजबाबदार वक्तव्य हे राष्ट्रहिताला बाधा पोहोचवणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी व सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीष महाजन यांची राज्य मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही मोहीम कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नसून, भारताचे तुकडे करण्याचे भीषण कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबवलेली ती एक अत्यंत कठीण पण आवश्यक कारवाई होती. स्वतःच्या जीवाला निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याची पूर्ण कल्पना असूनही, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला होता, ज्याचे परिणाम म्हणून पुढे खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर, या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करत त्यांच्याही प्राणांची आहुती घेतली. देशाच्या संरक्षणासाठी आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचे अत्यंत निषेधार्ह काम मंत्री गिरीष महाजन यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांकडून केले जात आहे, हे दुर्दैवी असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रविघातक प्रवृत्ती समोर आली आहे. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबवले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. तसेच यात देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमीत सहभागी होते. मग महाजन त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. काय म्हणाले होते गिरीश महाजन? गिरीश महाजन त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मी म्हणेल हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. 6 जून 1984 हा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही. ज्या पद्धतीने आपले हजारो भाऊ-बहीण शहीद झाले, मारले गेले. आपल्या पवित्र धर्म स्थळावर आक्रमण झाले. इंदिराजीने त्यांना जबरदस्ती पंजाबमध्ये घुसवले, आपल्या पवित्र स्थळी घुसवले. त्यानंतर इतक्या वाईट पद्धतीने आपल्या लोकांना मारण्यात आले. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणतात, ज्या प्रकारे अब्दालीने दिल्लीत घुसून आपल्या लोकांना मारले होते, त्याच पध्दतीने आपल्याच देशात आपल्याच प्रधानमंत्र्यांनी आपली वाईट अवस्था करून टाकली होती. दुःखाची गोष्ट तर ही आहे, की एवढे कत्तली झाल्यानंतरही कोणालाही शिक्षा नाही मिळाली. कोणी फाशीवर नाही गेले. ही विचार करण्यासाठी आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे.
Source link
गिरीष महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा:'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' वरील विधानावरून कॉंग्रेस आक्रमक; काय म्हणाले होते महाजन?