![]()
काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर टीका करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. अमृता फडणवीस म्हणाल्या की, महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेसने महिलांचा सन्मान राखला पाहिजे. सुनेत्राताई सक्षम नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. त्या केवळ अजित पवार यांच्या पत्नी नाहीत, तर त्यांच्या राजकीय प्रवासात कायम भक्कमपणे पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या पाठीशी होत्या म्हणूनच अजितदादा पुढे येऊ शकले आणि त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सुनेत्राताईंना कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे याचे भान आहे. नेतृत्व म्हणजे केवळ वक्तव्ये करणे नसते, तर शांतपणे काम करून जनतेचा विश्वास संपादन करणे असते. काँग्रेसने प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करण्याऐवजी कोण प्रत्यक्ष काम करत आहे, याचा विचार करावा. ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगाबद्दल काँग्रेसने माफी मागणे आवश्यक आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. “मला वाटते आपण वर्तमानात राहिले पाहिजे. हितचिंतक विविध प्रकारच्या चर्चा करत असतात. देवेंद्रजी सध्या महाराष्ट्राची सेवा करत आहेत. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहे आणि ते राज्यासाठी चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील राजकारणाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Source link
'गुंगी गुडिया' वक्तव्यावर अमृता फडणवीस आक्रमक:म्हणाल्या – महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे; सुनेत्रा पवार सक्षम नेत्या