Headlines

बोजा नोंदीसाठी लाचेची मागणी महागात:राजाचे कुर्लेतील तलाठी, कोतवाल ACBच्या सापळ्यात; 3 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले




सातारा जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी धडक कारवाई करत खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि कोतवाल यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील ६३ वर्षीय शेतकरी यांनी कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित मिळकतीवर पतसंस्थेच्या नावाचा बोजा महसूल अभिलेखात नोंदविणे आवश्यक होते. ही नोंद करण्यासाठी राजाचे कुर्ले येथील ग्राम महसूल अधिकारी विलास पांडुरंग नागरगोजे (वय ५१) आणि कोतवाल जगन्नाथ नामदेव उमापे (वय ४९) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. ३१ जुलै रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत सुरुवातीला तलाठीकडून २,५०० रुपये व कोतवालाकडून ३,००० रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारण्याचे दोघांनी निश्चित केल्याचे तपासात स्पष्ट झाले. याआधारे एसीबीच्या पथकाने मंगळवारी पुसेसावळी येथील मंडळ व तलाठी कार्यालयात सापळा रचला. कार्यालयाच्या जिन्यात कोतवाल जगन्नाथ उमापे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर या प्रकरणातील तलाठी विलास नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे, गणेश ताटे तसेच चालक अजित कर्णे यांच्या पथकाने ही यशस्वी सापळा कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *