![]()
शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या इतर खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावत त्यांचे सहा खासदार आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश आले होते. या पार्श्वभूमीवर, दिल्लीत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे राज्यात आता ‘ऑपरेशन टायगर’चा पुढचा टप्पा सुरू होणार का, अशा राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे. काही काळापूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाले होते. तेव्हापासून शिंदे गटाचे लक्ष ठाकरे गटाच्या आणखी काही आमदारांवर असून, त्यांना पक्षात आणण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या इतर खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. कोणते खासदार होते सोबत? खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय दीना पाटील आणि नुकतेच शिंदे गटात सामील होऊन विधानसभेचे उपसभापती झालेले सचिन अहीर यांचा समावेश होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अमित शाह आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये झालेली ही दुसरी मोठी भेट आहे. मात्र, या भेटीचा सविस्तर तपशील आणि नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीसंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची आज दिल्ली येथे त्यांच्या संसदीय कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आदरणीय गृहमंत्री महोदयांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, संजय दिना पाटील, ओम राजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Source link
श्रीकांत शिंदेंसह शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट:राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क