![]()
“माझे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे,” असे ठामपणे सांगणारी 18 वर्षांची तरुणी आजही आपल्या निर्णयावर ठाम आहे. अल्पवयीन असताना ती प्रियकरासोबत घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारागृहात जावे लागले. मुलगी मात्र आजही त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्धार व्यक्त करते. ही केवळ एका मुलीची कहाणी नाही. शहरासह मराठवाड्यात अशा अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांमधून किशोरवयातील भावनिक निर्णय, कौटुंबिक संवादाचा अभाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि कायद्याबाबतची अपुरी माहिती यांचे गंभीर परिणाम दिसून येतात. भारतीय कायद्यानुसार मुलीचे विवाहासाठी किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे आहे. मात्र भावनिक आवेगात घेतलेले निर्णय अनेकदा शिक्षण, करिअर, कुटुंब आणि भविष्यासाठी गंभीर अडचणी निर्माण करतात. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 उद्देश: 18 वर्षांखालील बालकांचे संरक्षण, संगोपन, पुनर्वसन आणि त्यांच्या सर्वोत्तम हिताचे जतन करणे.
बाल कल्याण समिती संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या पुनर्वसन, काळजी आणि संरक्षणाबाबत निर्णय घेणारी सक्षम वैधानिक संस्था.
बालकांचा सहभाग: अधिनियमाच्या कलम 3(iii) – नुसार, बालकाचे वय, परिपक्वता आणि समज लक्षात घेऊन त्याचे मत ऐकणे व त्याला योग्य महत्त्व देणे आवश्यक आहे.
सर्वोत्तम हिताचे तत्त्व: कलम 3(iv) नुसार प्रत्येक निर्णय हा बालकाच्या सर्वोत्तम हितासाठी असणे आवश्यक आहे.
सुधारणेवर भर: हा कायदा शिक्षेपेक्षा संरक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनावर अधिक भर देतो.
पोक्सो कायदा: अल्पवयीन मुलीची संमती असली तरी लैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा मानला जातो. या कायद्याचा उद्देश अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे हा आहे. केस 1 : भावनिक गुंतवणूक अन् शिक्षणाचा बळी नववीत शिकणारी एक मुलगी तरुणाच्या प्रेमात पडली. तो लग्नाचे आश्वासन देत असल्याने ती वारंवार घरातून निघून गेली. पालकांनी परत आणूनही तिने शिक्षणाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. तिचा ठाम दावा होता, 18 वर्षे पूर्ण होताच मी त्याच्याशीच लग्न करणार. तपासात, मुलीचा आईकडून होणाऱ्या छळामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. त्या काळात तिची त्या मुलाशी जवळीक वाढल्याने दोघे एकत्र राहू लागले अन् मुलगी गर्भवती झाली. “माझ्या गर्भात त्याच्या प्रेमाची निशाणी आहे मी हे बाळ जन्माला घालणारच.” असे ती म्हणते. केस 2 : कौटुंबिक कलह 17 वर्षांच्या मुलीने बाल कल्याण समितीसमोर सांगितले की, आईच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थितीमुळे तिला घरात सुरक्षित वाटत नव्हते. या वातावरणाला कंटाळून ती एका परिचित मुलासोबत घर सोडून गेली. पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असताना तिने आईकडे परत जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण कौटुंबिक असुरक्षितेने किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधते. केस 3 : डिजिटल भुलभुलैया मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलीची सोशल मीडियावरून तरुणाशी ओळख झाली. काही दिवसांतच ती त्याच्यासोबत घरातून निघून गेली. नंतर तिला समजले की तो आधीच विवाहित आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर अन् सामाजिक गुंतागुंतीमुळे तिच्या भविष्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. हे प्रकरण सोशल मीडियाच्या अतिवापराकडे वळण घेते. घटनांची दाहकता दाखवणारी प्रकरणे अनेक किशोरवयीन मुला-मुलींचे निर्णय केवळ आकर्षणामुळे नाही तर त्यामागे तुटलेला कौटुंबिक संवाद, असुरक्षित वातावरण अन् योग्य मार्गदर्शनाचा अभाव ही प्रमुख कारणे असतात. पालकांनी मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करत त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणेही काळाची गरज आहे. केवळ कायद्याची भीती नव्हे, तर संवाद, विश्वास हाच अशा घटनांवर उपाय आहे. – विद्या लंके-कानडे, सदस्य, बाल कल्याण समिती, जालना
Source link
गुन्हा दाखल, प्रियकर तुरुंगात;तरीही मुली म्हणतात तोच होणार माझा धनी:किशोरवयातील भावनिक निर्णयांचे गंभीर सामाजिक, कायदेशीर परिणाम