.

बार्शी तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने ने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीची सुरुवात करून दिली आहे. गौडगाव मंडळामध्ये पेरणीयोग्य, पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची गौडगाव मंडळात ९८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे.
यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. एक-दोन हलका पाऊस पडल्याने गौडगाव मंडळातील शेतकऱ्यांनी मशागत करून घेतली होती. रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्यात सहा दिवस काही ठिकाणी-तुरळक पाऊस झाला. त्यानंतर मृग नक्षत्रात दोन दिवस पाऊस झाला, तर तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व आर्द्रा नक्षत्राच्या शेवटी पुन्हा पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असले, पेरणीसाठी आर्द्रा नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्या काही प्रमाणात पूर्ण करत वरुणराजाने गौडगाव मंडळांमध्ये चांगला पाऊस दिला.
गेल्या आठवड्यात पासून शेतकऱ्यांनी धाडस करून गौडगाव मंडळामध्ये सोयाबीन उडीद पेरणी केली आहे या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही प्रमाणात सोयाबीनची ओपन क्षमता झाली असून पेरलेल्या सोयाबीनसाठी दिलासादायक पाऊस असल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. शेतकरी आता दमदार आणि मुसळधार पावसाची वाट पाहत आहे. मृग नक्षत्रामध्ये पेरणी न झाल्यामुळे आणि दमदार पाऊस नसल्यामुळे यावर्षी खरीप उत्पादन घट होणार असल्याचे कृषी अभ्यासाकडून आणि जाणकार शेतकरी सांगत आहेत. खरीप हंगामातील पिकांवरच शेतकऱ्यांचे वर्षभराचेआर्थिक गणित अवलंबून असते. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्रही संपत आले, तरी बहुतांश भागात अद्याप पेरणीला सुरुवात झालेली नाही. काही भागांत मात्र शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा मृग नक्षत्रात काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अनेक भागांत पेरणीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे. कोरड्या पडलेल्या शेतजमिनीला ओलावा मिळाल्याने पिकांबाबत आशावाद निर्माण झाला. येत्या काही दिवसांतही चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
बार्शी तालुक्यातील दहा मंडळातील पावसाची स्थिती बार्शी तालुक्यातील दहा मंडळात पैकी सहा मंडळात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडला तर चार मंडळात अत्यल्प पाऊस पडला आहे. बार्शी ९६, आगळगाव ११० , वैराग ४४, उपळे ८९, गौडगाव ९८, पांगरी ११३ , पानगाव ६३ ,सुरडी ३९ ,खांडवी ३५, जूनअखेर सर्वाधिक नारी मंडळात १३३ मिलीमीटर पावसाची नोंद तर सर्वात कमी खांडवी मंडळात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.