Headlines

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू




स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने महावितरणमध्ये आंदोलन केले. आमदार संग्राम जगताप यांच्या इशाऱ्यानंतर महावितरणच्या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. आनंदनगर येथील गंजलेल्या आणि वाकलेल्या धोकादायक खांबाबाबत तब्बल वर्षभरापूर्वी २१ ऑगस्ट २०२५ रोजीच महावितरणकडे तक्रार झाली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी या तक्रारीचे निराकरण केले नाही. तसेच, घटनेच्या वेळी पोलजवळून धूर निघत असताना महावितरणच्या तक्रार निवारण क्रमांकावर संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच ही घटना घडल्याने अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक दत्ता गाडळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी या प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले, तर दोघांना निलंबित केले. वाढत्या संतापाची दखल घेत अधीक्षक अभियंत्यांनी आनंदनगर भागातील वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेले सहाय्यक अभियंता विनोद आसाराम पांढरे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ शरद रामदास काकडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे. प्राप्त तक्रारींचे वेळेवर निराकरण न करणे आणि कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनात शहरात अनेक ठिकाणी वीज खांब अयोग्य व सदोष पद्धतीने उभे केल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने, शहरातील अशा सर्व धोकादायक खांबांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या. चुकीच्या पद्धतीने खांब उभारणीचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेशही महावितरणकडून देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *