![]()
विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये ३३४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. ११० नागरिक गंभीर जखमी झाले. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे, असेही पत्रात नमूद केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात धाव घेतली होती. यातही सर्वाधिक रस्ते बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. या मतदारसंघात जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, तसेच ग्रामीण रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. दीर्घकाळ रखडलेली देखभाल यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच परिस्थितीमुळे मागील सात वर्षांत ८५१ अपघात घडल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे, असे आमदार देशमुख यांचे म्हणणे आहे. या अपघातांमध्ये ३३४ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. आमदार देशमुख यांनी बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून रस्ते अपघातांची माहिती मागितली. तेव्हा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक नागरिक मणक्याचे विकार, सांधेदुखी, व इतर शारीरिक समस्यांनी त्रस्त असल्याचे निवेदनात नमूद आहे. आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, व नूतनीकरणासाठी किमान १५० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी केले होते आंदोलन : अकोला तालुक्यातील आगर-उगवा (नागद, सागद, हाता, हातरण रोड) या रोडचे रुंदीकरण व पुलांसाठी सुमारे १४ कोटी मंजूर असतानाही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी मार्च महिन्यात आंदोलन केले होते. सुमारे १८ गावांच्या परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मंडप टाकून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र काही वेळाने त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिला होता. आंदोलनावरून पोलिस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जाग आलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रस्त्यावर येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. २५ मार्चपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. तातडीने कार्यवाही करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, असे आ. देशमुख यांचे म्हणणे आहे. या पत्रासोबत रस्त्यांचे जिओ टॅगिंगचे फोटोही सादर करण्यात आले आहेत. कोणत्या रस्त्यावर किती रुपयांचा निधी हवा, हेही त्यांनी नमूद केले आहे. रस्ता किती कि.मी. आहे, हेही त्यांनी तपशीलवार नमूद केले आहे.
Source link
बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू