![]()
कन्नड-नागद रस्त्यावरील गौताळा अभयारण्यातील गौताळा खांडी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कला शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. समाधान रतन सोनवणे (३३, रा. चिमणापूर, ता. कन्नड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सोनवणे हे महिनाभरापूर्वीच गंगापूर तालुक्यातील माळीवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अंशकालीन कला शिक्षक म्हणून मानधनावर रुजू झाले होते. दररोजप्रमाणे ते शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच ४६ बीएच ०५६५) ने शाळेकडे जात होते. गौताळा खांडीतील अवघड वळणावर चढण चढत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि चालक वाहन घेऊन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मोतिंगे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान जुळी मुले, भाऊ व बहीण असा परिवार आहे. घराचा कमावता आधार गेल्याने चिमणापूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कन्नड शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Source link
गौताळ्याच्या खांडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू:माळीवडगाव येथील शाळेकडे जाताना अपघात, 1 महिन्यापूर्वीच झाले रुजू