![]()
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे आणि माहिम स्थानकांदरम्यान एका चालत्या लोकलमधून प्रवाशाला खाडीत फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. नेमके काय घडले? रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्चगेट-बोरिवली या धीम्या मार्गावरील लोकलमध्ये घडली. दुपारी १:२४ च्या सुमारास ही लोकल वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर पोहोचली. त्यावेळी लोकलच्या दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली की, एका व्यक्तीने माहिम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान चालत्या ट्रेनमधून एका प्रवाशाला खाली ढकलून दिले आहे. प्रवाशावर रुग्णालयात उपचार घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तत्काळ माहिम ते वांद्रे दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक आणि खाडी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी ढकलून दिलेला व्यक्ती पोलिसांना बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तातडीने वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीचा अजब दावा याप्रकरणी पोलिसांनी ४८ वर्षीय अमजद सफरुद्दीन शेख या आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा आरोपी मनोरुग्ण असावा असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अत्यंत अजब दावा केला आहे. ‘दिव्यांग डब्यात एक कावळा आला होता, त्याला हाकलण्याच्या प्रयत्नात चुकून धक्का लागल्याने हा अपघात झाला,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय:राज्यात आजपासून सुटे तेल विक्रीवर पूर्णपणे बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई दूध आणि अन्य अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेल विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, राज्यातील कोणत्याही दुकानदाराला सुटे खाद्यतेल विकता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून सुट्टे तेल विक्री सुरू ठेवल्यास संबंधित विक्रेत्यांवर FDAकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खाद्यतेल विक्रेत्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. सविस्तर वाचा
Source link
चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये धक्कादायक प्रकार:प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकले, गंभीर जखमी; आरोपीला ठोकल्या बेड्या