![]()
शहरातील वाढती अस्वच्छता, घंटागाडीकडून अनियमित कचरा संकलन यासह तुंबलेल्या गटारींच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे व स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे यांना निवेदन देत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने याप्रश्नी दखल न घेतल्यास घरोघरी साचलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे संकलित करून वाजतगाजत न.प. कार्यालयाच्या आवारात आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरात कचरा संकलन करणारी घंटागाडी अनेक दिवसांपासून नियमित येत नसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे दुर्गंधीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आजारांचा धोका वाढल्याचा दावा पक्षाने केला आहे. यंदा घरपट्टीतील स्वच्छता कर माफ करण्याची मागणीही केली आहे. स्वच्छतेप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कचऱ्याने भरलेला डस्टबिन स्वच्छता अभियंता सोनवणे यांना देण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख प्रसाद प्रजापत, शहर संघटक सचिन खैरनार, शहर समन्वयक सुरेश सोनवणे, उपशहरप्रमुख शंभूराजे खैरे, धीरज संकलेचा, तोफिक शेख, अकबर पठाण आदी उपस्थित होते.
Source link
चांदवडमध्ये स्वच्छतेचा प्रश्न त्वरित मार्गी लावा:शिवसेना ठाकरे गटाचे नगरपरिषदेला निवेदन