Headlines

चाकण-हिंजवडीसाठी 1826 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी:मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली तत्त्वतः मंजुरी; वाहतूक कोंडी आणि पाणी निचरा समस्या सुटणार




चाकणमधील वाहतूक, रस्ते, पावसाळी पाणी निचरा आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १,४०० कोटी रुपयांचा, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांचा एकात्मिक पायाभूत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या दोन्ही आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. डिसेंबरपासून कामांना सुरुवात करून पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा करण्याचे नियोजन आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. चाकणमधील विकासकामांसाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांसह संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ७८ किमी नाले मोकळे करणार चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे ७८ किलोमीटर नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे कंपन्यांमध्ये पाणी शिरणे आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. नाले मोकळे करणे, ३८ किलोमीटर रस्त्यालगत पावसाळी गटारे उभारणे, कल्व्हर्ट व पुलांची क्षमता वाढविणे आणि आवश्यक ठिकाणी पाणी साठवण व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाली असून जून २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. चाकणमधील ४९८ किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करून पहिल्या टप्प्यात ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था, पावसाळी निचरा आणि वाहतूक सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. ५०० अतिरिक्त बस; एआयवर वाहतूक नियंत्रण पुणे व पिंपरी-चिंचवडमधून चाकणकडे येणाऱ्या कामगारांसाठी सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असल्याचे आराखड्यात नमूद आहे. सहा महत्त्वाच्या चौकांची पुनर्रचना, नियोजित यू-टर्न, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सिग्नल, कॅमेरे, रडार, वाहन क्रमांक ओळख प्रणाली आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. मोठ्या वाहनांसाठी पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे, तर १०० एमव्हीए क्षमतेचे वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. १४ गावे आणि दोन नगर परिषदांसाठी केंद्रीकृत घनकचरा प्रक्रिया केंद्रही प्रस्तावित आहे. हिंजवडीत ४२६.५४ कोटींची कामे हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ४२६.५४ कोटींच्या आराखड्यात विविध वाहतूक व नागरी सुविधांची कामे प्रस्तावित आहेत. वीजपुरवठ्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंजवडीतील कचरा संकलनासाठी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *