Headlines

चितळे बंधूंच्या नावाने ऑनलाइन मिठाईची फसवणूक:गुगल प्रोफाइलवर अधिकृत लँडलाइनऐवजी अनोळखी मोबाइल नंबर; पैसे घेतल्यानंतर ग्राहकांचे नंबर ब्लॉक




चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाने ऑनलाइन मिठाईची ऑर्डर स्वीकारून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चितळे बंधूंच्या शाखेचा अधिकृत लँडलाइन क्रमांक बदलून त्या ठिकाणी सायबर चोरट्याने आपला मोबाइल क्रमांक टाकला. या क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्यानंतर मिठाई न देता संबंधित क्रमांक ब्लॉक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यावर वर फसवणूक केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चितळे बंधू मिठाईवाले यांचे स्वीय सहाय्यक नितीन अभिमन्यू दळवी (वय ३७, रा. शेवंता हाईट्स, सातारा रस्ता, शंकर महाराज मठ रस्ता, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. २३ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाजीराव रस्त्यावरील चितळे बंधूंच्या शाखेतील संगणकावर तपासणी करीत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. शाखेचा अधिकृत लँडलाइन क्रमांक असताना ऑनलाइन (गुगल) प्रोफाइलवर सायबर चोरट्याने आपला मोबाइल क्रमांक टाकण्यात आला होता. हा क्रमांक चितळे बंधूंचाच असल्याचे भासवून ग्राहकांकडून मिठाईच्या ऑनलाइन ऑर्डर स्वीकारल्या. त्यानंतर ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून मिठाईची डिलिव्हरी न करताच संबंधित मोबाइल क्रमांक ब्लॉक केला जात होता. या प्रकारात आतापर्यंत किती ग्राहकांची फसवणूक झाली आहे आणि किती रक्कम उकळण्यात आली आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) लायगुडे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *