Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह, नशामुक्ती अभियान सुरू:विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून सामाजिक संदेश दिला




छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन व नशामुक्त अभियानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान १३ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. मिन्नू आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. रश्मी बोरीकर, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, दीपाली थावरे, दिलीप शिरसाठ आणि शिक्षण विस्तार अधिकारी जयेश चवरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी बालविवाह व नशामुक्तीविषयी जनजागृती करणारी भव्य प्रभात फेरी काढली. विविध घोषवाक्ये, फलक आणि सामाजिक संदेशांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदलाचा संदेश दिला. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. मिन्नू यांनी सांगितले की, सुदृढ समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने निर्व्यसनी जीवन जगण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या असून, तिच्या निर्मूलनासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हे अभियान केवळ काही दिवसांपुरते मर्यादित न राहता वर्षभर जनजागृतीच्या माध्यमातून सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मरकर यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून व्यसनाचे विविध प्रकार, त्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम यावर प्रभावी मार्गदर्शन केले. व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. महिला व बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी बालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइनची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शारदा मंदिर प्रशाला, इंदिराबाई पाठक महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यांमधून बालविवाह व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. या पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या अभियानात श्री सरस्वती भुवन प्रशाला, शारदा मंदिर प्रशाला, श्री सरस्वती भुवन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आ. कृ. वाघमारे विद्यालय आणि शिशुविहा या संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *